सुभाष घई, गुलजार, मनोज वाजपेयी यांची ‘इफ्फी’ला उपस्थिती

By Admin | Published: November 16, 2014 01:29 AM2014-11-16T01:29:05+5:302014-11-16T01:29:53+5:30

तयारी अंतिम टप्प्यात : निर्माते, दिग्दर्शक, संगीतकारांचाही सहभाग

Subhash Ghai, Gulzar, Manoj Bajpayee's presence in IFFI | सुभाष घई, गुलजार, मनोज वाजपेयी यांची ‘इफ्फी’ला उपस्थिती

सुभाष घई, गुलजार, मनोज वाजपेयी यांची ‘इफ्फी’ला उपस्थिती

googlenewsNext

पणजी : ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. इफ्फीत खास सिने कलाकारांची उपस्थिती लागावी यासाठी महोत्सव संचालनालयाने अनेक सिनेस्टारना आमंत्रित केले आहे. यातील काही कलाकारांनी इफ्फीदरम्यान येण्याचे मान्य केले
आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी दिली.
यात शेखर कपूर, गुलजार, मनोज वाजपेयी, पवन कालिया, मुनमून सेन, पाउली दाम, सुभाष घई, सतीश कौशिक, विनय पाठक, रूपा गांगुली, रजत कपूर, अनंत महादेवन, कौशिक गांगुली, रसूल पुकुट्टी, श्याम बेनेगल, टिनू आनंद, अर्पिता चटर्जी, राजू हिराणी, ध्रितीमन चटर्जी, जयराम, विधू विनोद चोप्रा, अभिजीत जोशी, गोविंद निहलानी या कलाकारांचा समावेश आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक, संगीतकारांचाही यात सहभाग असणार आहे.
महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुपरस्टार अमिताभ बच्चन, माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड उपस्थित असतील. महोत्सवाचे सूत्रसंचालन कलाकार अनुपम खेर व अभिनेत्री रविना टंडन करणार आहेत.
श्रद्धांजली विभागात सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. भारतीय पॅनोरमा विभागात मराठी चित्रपट डॉ. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ दाखविण्यात येईल. तर चीनचे सिने निर्माते वाँग कार वाय यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
राजधानीत शासकीय इमारती, रस्ते, कला अकादमी, मांडवी पूल यांच्या सुशोभीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. प्रतिनिधी संख्येनेही यंदा १२ हजाराचा आकडा पार केला आहे. यंदा इफ्फीसाठी साधारण १४ हजारपर्यंत प्रतिनिधी नोंदणी करण्याचे लक्ष्य गोवा मनोरंजन संस्थेने ठेवले होते. इफ्फी सुरू होण्यासाठी
अजून चार दिवस शिल्लक असल्याने हा आकडा चौदा हजारापर्यंत पोहोचेल, असे नाईक यांनी
सांगितले.
कांपाल फुटबॉल मैदानावर उभारण्यात येणाऱ्या स्क्रिनवर देवदास, रब ने बना दी जोडी, ताल अशा तऱ्हेचे निवडक चित्रपट दाखविले जाणार आहेत.
कोकणी विभागातून पाखलो, निरागस या लघुचित्रपटांची निवड झाली आहे. वर्ल्ड सिनेमा विभागात दाखविण्यात येणारे चित्रपट हे प्रीमियर असणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
या वेळी महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्य सचिव, आमदार किरण कांदोळकर, सीईओ राजेंद्र सातार्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Subhash Ghai, Gulzar, Manoj Bajpayee's presence in IFFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.