गोव्यातील मडगाव येथील सोनसोडोवर पुन्हा आगीचा भडका; 1 कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 06:00 PM2019-12-05T18:00:47+5:302019-12-05T18:01:04+5:30

गोव्यातील मडगाव येथील सोनसोडो कचरा यार्डाने पुन्हा एकदा पेट घेतला. आज गुरुवारी दुपारी येथील कचरा यार्डाला आग लागली.

sonsodo garbage yard caught fire; 1 worker injured | गोव्यातील मडगाव येथील सोनसोडोवर पुन्हा आगीचा भडका; 1 कामगार जखमी

गोव्यातील मडगाव येथील सोनसोडोवर पुन्हा आगीचा भडका; 1 कामगार जखमी

Next

मडगाव: गोव्यातील मडगाव येथील सोनसोडो कचरा यार्डाने पुन्हा एकदा पेट घेतला. आज गुरुवारी दुपारी येथील कचरा यार्डाला आग लागली. बायो मिथेशन पध्दतीने येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे दोन प्रकल्प सुरु व्हायचे आहे, त्यासाठी येथील कचऱ्याचा ढिगाची पहाणी करण्यासाठी आले असता झाड कापताना ३३ केव्ही उच्चदाबाच्या वीज वाहिन्यांचा स्पर्श होउन झाडाने पेट घेतला व ठिणगी खाली पडून कचऱ्याने पेट घेतला. यात वैभव धुळाप (२३) हा कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी त्याला सुरुवातीला मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यानंतर त्याला आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

सोनसोडो कचरा यार्डातील कचऱ्याचा ढिगाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी तो आला होता. त्यावेळी त्याच्यावर ही आपत्ती कोसळली. सदया त्याच्यावर गोमेकॉत उपचार चालू असून, त्याला इजा पोहचली असल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. अचानक सोनसोडो येथे गुरुवारी दुपारी कचऱ्याला आग लागल्याने येथे धुराचे लोट पसरले. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले. याच वर्षी मे महिन्यात सोनसोडो येथे आग लागली होती. कित्येक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले होते. कालच्या आगीच्या घटनेने मे महिन्यात झालेल्या या भीषण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी दुपार पर्यंत चार बंबचा वापर करण्यात आला. मात्र आग विझविणे दलाच्या जवानांना शक्य झाले नाही. कचऱ्यामध्ये प्लास्टिक मोठया प्रमाणात असल्याने आग विझविणे मुश्किल झाले होते. आगीमुळे धुराचे लोट या भागात पसरले होते. त्यातच वारा घोगांवत असल्याने धूर मोठया प्रमाणात पसरला होता. आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानतंर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही घटनास्थळी धाव घेतली. येथे प्लास्टिक कचरा मोठया प्रमाणात साचला आहे. आपण या दुर्घटनेबददल मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पूजा नाईक यांनीही घटनास्थळी भेट दिली.

शॅडो काउन्सिलने व्यक्त केली होती आगीची भिती

शॅडो काउन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनीही घटनास्थळी भेट दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोनसोडो येथील जुन्या कचऱ्याचा डंपात सुका कचरा टाकण्यास मनाई असतानाही येथे हा कचरा टाकला जात आहे. आम्ही यावर आवाजही उठविला होता. या कचऱ्यामुळे येथे आगी सारख्या दुर्घटना घडून अर्नथ होउ शकतो अशी भितीही आम्ही व्यक्त केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमची भिती कालच्या दुर्घटनेमुळे खरी ठरली असे सावियो कुतिन्हो यांनी दै. लोकमतशी बोलताना सांगितले. कालच्या दुर्घटनेला कुणाला जबाबदार धरावे असा सवालही त्यांनी केला आहे.

आगीचे वृत्त पसरल्यानंतर येथ बघ्याचींही गर्दी झाली होती. दुपारी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगावातील कचर्यासाठी सोनसोडो येथे मडगाव पालिकेने निश्चित केलेल्या नवीन जागेसाठी आज शुक्रवारी पहाणी होणार आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ही पहाणी करणार आहेत. सोनसोडो परिसरातच १६00 चौरस मीटर एवढी जागा नव्या प्रकल्पासाठी सूचित केली आहे. जागा पहाण्याचा दिवस जवळ आला असतानाच सोनसोडो येथील कचर्याने पुन्हा एकदा पेट घेतल्याने रहिवाशांमध्येही तर्कविर्तक मांडले जात आहे.

दरम्यान, गुरुवारच्या आग दुर्घटना प्रकरणी पोलीस तपास चालू असल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुमेधा नाईक या पुढील तपास करीत आहेत.

Web Title: sonsodo garbage yard caught fire; 1 worker injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :firegoaआगगोवा