कदंब पठारावरील बंगल्यात दरोडा; ८ ते १० लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 07:49 IST2026-04-16T07:48:49+5:302026-04-16T07:49:06+5:30
कदंब पठार या नेहमी गजबजलेल्या, जागरूक असलेल्या या भागात सहजपणे चोरी होणे, ही चिंतेची बाब ठरली.

कदंब पठारावरील बंगल्यात दरोडा; ८ ते १० लाखांचे दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राजधानी पणजी नजीकच्या कदंब पठार या उच्चभ्रू वस्तीत रविवारी मध्यरात्री सुरक्षेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. तीन संशयित चोरट्यांनी एका तीन मजली बंगल्यात प्रवेश करून सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या परिसरात रहिवाशांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कदंब पठार या नेहमी गजबजलेल्या, जागरूक असलेल्या या भागात सहजपणे चोरी होणे, ही चिंतेची बाब ठरली. राजीव अग्रवाल यांच्या मालकीच्या बंगल्यात ही घटना घडली. विशेष म्हणजे, चोरटे पहिल्या मजल्यावरील खोलीत शिरले आणि कोणालाही सुगावा लागू न देता दागिन्यांवर डल्ला मारून पसार झाले.
सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद, पण...
घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यात तीन व्यक्ती बंगल्यात शिरताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामध्ये त्यांचे चेहरे कपड्याने झाकले होते. संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
रहिवाशांमध्ये घबराट
सोमवारी सकाळी ५ च्या सुमारास जेव्हा घरातील व्यक्तीला विस्कटलेले सामान दिसले, तेव्हा ही चोरी उघडकीस आली. उच्चभ्रू वस्तीतील या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
सध्या पोलिस या प्रकरणातील चोरीला गेलेल्या मालाचा अचूक तपशील मिळवत असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा छडा लवकर लावतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कदंब पठारावरील चोरीच्या या घटनेचा सखोल तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - पोलिस निरीक्षक गौरीश मळीक