गव्याच्या हल्ला मृत्यू प्रकरणी आता पोलीस चौकशी; दिनेशचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:08 IST2026-05-11T13:07:28+5:302026-05-11T13:08:26+5:30

वैद्यकीय सल्ला न घेता वनखात्याचा निष्कर्ष, डॉ. मधू घोडकिरेकर यांचे स्पष्टीकरण

police now investigating gaur attack death case dinesh death is claimed to be suspicious | गव्याच्या हल्ला मृत्यू प्रकरणी आता पोलीस चौकशी; दिनेशचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा

गव्याच्या हल्ला मृत्यू प्रकरणी आता पोलीस चौकशी; दिनेशचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गेल्या आठवड्यात उसगाव येथील दिनेश गावडे या गृहरक्षकाचा बेतोडा जंक्शन येथे झालेला मृत्यू हा गव्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचा ठोस आधार नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संशय असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावे, अशी शिफारस उपवनपाल जीस के. वर्के यांनी आपल्या अहवालात नमूद केली आहे. याबाबत वन खात्याने दक्षिण गोवापोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशीची शक्यता आहे.

मृत दिनेश गावडे, साक्षीदार तसेच अन्य काही जणांच्या मोबाइल रेकॉर्ड डेटाची पडताळणी करावी असे याबाबतच्या पत्रात नमूद केले आहे. गावडे यांचा दुचाकीवरून दि. ६ रोजी बेतोडा जंक्शनहून उसगावला जाताना अपघातात मृत्यू झाला होता. गव्याने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, वन खात्याच्या तपासात दिनेश यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाल्याचे आढळले नाही. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे गव्याचे अस्तित्व असल्याचाही पुरावा आढळून आलेला नाही, असे उपवनपाल जीस वर्के यांनी अहवालात नमूद केले आहे.

दरम्यान, दिनेश गावडे मृत्यू प्रकरणातील साक्षीदारांच्या जबाबांमध्येही विसंगीत दिसून येत आहे. त्यांनी पोलिस आणि वन खात्याला दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. त्यामुळे मयत, साक्षीदार व अन्य जणांचा मोबाइल रेकॉर्ड डेटा तपासावा, असे वन खात्याने नमूद केले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तसेच ज्या मार्गावरून मृत दिनेश गावडे दुचाकीने गेले त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे, अशी मागणी वन खात्याने केली आहे.

त्यांना भाष्य करण्याचा अधिकार नाही : घोडकिरेकर

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे डॉ. मधू गावडे घोडकिरेकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, दिनेशच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाबाबत कोणतेही निष्कर्ष काढण्याचा अधिकार वन खात्याला नाही. मृतदेहावरील वैद्यकीय निरीक्षण आणि त्यावरील निष्कर्ष हे केवळ फॉरेन्सिक व मेडिको-लीगल तज्ज्ञांच्या अधिकार क्षेत्रात येतात. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मत दिले असले तरी त्यांना मानवी शवविच्छेदन अहवालावर भाष्य करण्याचा अधिकार नाही.

अहवाल व्हायरल होणे चिंताजनक

दरम्यान, डॉ. घोडकिरेकर यांनी म्हटले आहे की, शवविच्छेदन अहवाल आणि वन विभागाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होणे ही चिंतेची बाब आहे. या संबंधीचे कागदपत्रे केवळ पोलिस विभागालाच दिली होती. त्यामुळे, गोपनीय माहिती लीक झाल्याप्रकरणी चौकशीची मागणी केली जाणार आहे.

अहवालात विसंगती

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ व ७ मे रोजी शवविच्छेदन अहवालाची पडताळणी केली. मात्र त्यात काही विसंगती आढळल्या. परिसरात गव्याच्या पायांचे ठसे, शेण आढळले नाही. अन्य मोठ्या वन्यप्राण्याची हालचाल झाल्याचे पुरावे नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

एका ठिकाणी रक्ताचे डाग

मृत दिनेश यांनी स्कूटर पार्क केलेल्या जागेपासून वाइन शॉपकडे जाणाऱ्या पायवाटेवर एका ठिकाणीच रक्ताचे डाग आढळले. शवविच्छेदन अहवालात मध्यभागी ७ सें.मी.ची जखम, मानेवर किरकोळ खरचटल्याची नोंद आहे. डोके किंवा चेहऱ्यावर जखमा नसल्याने संशय व्यक्त होत असल्याचेही उपवनपालांनी अहवालात नमूद केले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याने फेटाळले आक्षेप

दरम्यान, दिनेश याच्या मृत्यू प्रकरणी वनखात्याने संशय व्यक्त केल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण जारी केले. वन खात्याने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र पाठवले आहे. मात्र या पत्रातील निष्कर्ष चुकीचे व वैद्यकीय सल्ला न घेता काढण्यात आला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

जखमा गव्याच्या हल्ल्यासारख्याच

मृतदेहावरील जखमा, अंतर्गत दुखापती या गव्याच्या शिंगांच्या हल्ल्यासारख्याच आहे. गाय किंवा बैलाने धडक दिल्यानंतर होणाऱ्या जखमांपेक्षा या गंभीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे वन खात्याचे निष्कर्ष 'अवैज्ञानिक' असल्याचे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी म्हटले आहे.
 

Web Title : गार्ड की मौत की पुलिस जांच: गौड़ हमले का संदेह नहीं

Web Summary : पुलिस एक गार्ड की मौत की जांच कर रही है, शुरू में गौड़ के हमले का संदेह था। वन विभाग की रिपोर्ट में असंगतियां और गौड़ के सबूतों की कमी, गलत खेलने का सुझाव देती है। गवाहों के बयानों और फोरेंसिक विवादों में विसंगतियां जांच को बढ़ावा देती हैं।

Web Title : Police Investigate Guard's Death: Suspicion of No Gaur Attack

Web Summary : Police are investigating the death of a guard, initially suspected to be a gaur attack. Forest department reports inconsistencies and lack of gaur evidence, suggesting foul play. Discrepancies in witness statements and forensic disputes fuel the investigation.