the park at Sawali dam in Goa | वृंदावनच्या धर्तीवर आता लवकरच गोव्यातील साळावलीतही उद्यान
वृंदावनच्या धर्तीवर आता लवकरच गोव्यातील साळावलीतही उद्यान

मडगाव: म्हैसूरमधील वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर पर्यटकांचे पावसाळी आकर्षण असलेल्या दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यात असलेल्या साळावली धरणाच्या काठावर 42 एकर जागेत प्रशस्त असे उद्यान उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी बटरफ्लाय पार्क, नक्षत्र उद्यान, रॉक गार्डन, स्पायस गार्डन, नवग्रह उद्यान अशी नवीन आकर्षणे येणार आहेत. गोवा पर्यटक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

सुमारे 50 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणा-या या प्रकल्पाचे डिझाइन तयार करण्याचे काम फोर्थ डायमेंशन आर्किटेक्ट प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीचा आराखडा शेवटच्या टप्प्यावर आल्याची माहिती महामंडळाकडून मिळाली. पर्यटन विकास महामंडळाबरोबरच गोवा वनविकास महामंडळ आणि पाटबंधारे खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. स्थानिक आमदार प्रसाद गावकर यांचाही या प्रकल्पाला पाठिंबा आहे.

साळावलीचे धरण हे लाखो पर्यटकांसाठी पावसाळी आकर्षण आहे. पावसात हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळते. या धरणाच्या पायथ्याशी वनखात्याचे बॉटनिकल गार्डन असले तरी त्याशिवाय पर्यटकांना या ठिकाणी इतर सुविधा नसल्याने त्यांना अडचणीचे होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन हा नवीन प्रकल्प आणला आहे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेखाली या प्रकल्पाला निधी मिळविण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याची माहिती पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी दिली. ते म्हणाले, 'गोवा सरकार आता अंतर्गत पर्यटनावर भर देणार असून त्याच योजनेखाली वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर साळावलीत नवीन उद्यान उभारण्याचा आमचा विचार आहे.'

या उद्यानात पर्यटकांच्या सोयीसाठी माहिती केंद्र, विश्रम कक्ष यांच्याबरोबरच गोवा वनविकास महामंडळाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे. लहान मुले आणि दिव्यांगाच्या सोयीसाठी खास बग्गी ट्रॅक बांधण्यात येणार असून त्याशिवाय सुंदर अशा पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. या उद्यानातील पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार असून या उद्यानातील रोषणाईसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत खास पिकनिक स्पॉटस् बनविण्यात येणार असून त्यात गोव्यातील वेगवेगळी चर्चेस, मंदिरे, किल्ले, वारसास्थळे यांच्या चित्रंचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. पर्यटकांना सेल्फी घेण्यासाठी खास सेल्फी विभागही तयार करण्याची योजना या प्रकल्पाअंतर्गत आखण्यात आली आहे. याशिवाय या प्रकल्पात पर्यटकांसाठी नेचर ट्रेन, जायन्ट व्हील, टेहळणीच्या जागा आणि खानपानगृहाची सोय केली जाणार आहे.

ही असणार आकर्षण
बटरफ्लाय पार्क
नक्षत्र उद्यान
औषधी झाडांचे उद्यान
रॉक गार्डन
गुलाब उद्यान
स्पायस् गार्डन
ट्रॉपिकल गार्डन
नवग्रह गार्डन
ऑर्किड उद्यान

असे असणार साहसी खेळ
तिरंदाजीसाठी खास सोय
बंगी ट्रेम्पोलिन
रोप चॅलेन्ज
पेन्ट बॉल झोन
रॉक क्लायमिंग
मेझ
रॉकेट इजेक्टर
धबधबा
 

Web Title: the park at Sawali dam in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.