पणजी-बेती जलप्रवास होणार सुकर; कुशावती, साळावली फेरीबोटींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:04 IST2026-04-25T11:03:46+5:302026-04-25T11:04:39+5:30
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या नव्या फेरीबोटींचे लोकार्पण करण्यात आले.

पणजी-बेती जलप्रवास होणार सुकर; कुशावती, साळावली फेरीबोटींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पणजी ते बेती जलमार्गावर शुक्रवारी 'कुशावती' आणि 'साळावली' या नव्या दोन अत्याधुनिक फेरीबोटींचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या फेरीबोटींमुळे पणजी ते बेती दरम्यानचा प्रवास २ ते ३ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
या फेरीबोटींमध्ये प्रत्येकी १५० प्रवासी, ९ चारचाकी वाहने वाहण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक फेरीबोटींमुळे प्रवास आता अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या नव्या फेरीबोटींचे लोकार्पण करण्यात आले.
नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, की 'कुशावती' व 'साळावली' या अत्याधुनिक फेरी रो रो फेरीबोटीच्या धर्तीवर पणजी ते बेती जलमार्गावर सुरु करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवास करता येणार आहे. फेरीबोटींतून प्रवासी तसेच वाहनांची क्षमता वाढवली आहे. त्यात स्वच्छतागृहाचीही सुविधा आहे.
यावेळी साळगावचे आमदार केदार नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा रेश्मा बांदोडकर, नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमराजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार केदार नाईक यांच्या प्रयत्नांना यश
दिवाडी येथील जलमार्गावरही डिसेंबर पर्यंत रो रो फेरीबोटीची सेवा सुरु केली जाईल. याशिवाय नदी परिवहन खात्याच्या ताफ्यात आणखीन दोन नव्या फेरीबोटींची भर पडेल. सध्या कार्यरत असणाऱ्या जुन्या फेरीबोटींची जागा नव्या फेरीबोटी घेतील. पणजी ते बेती या मार्गावर सुरु केलेल्या नव्या फेरीबोटींचे श्रेय साळगावचे आमदार केदार नाईक यांना जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.