आमदार वीरेश बोरकर हाजीर हो!; पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : मनोज परब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:00 IST2026-05-18T12:00:31+5:302026-05-18T12:00:34+5:30
आमदार वीरेश बोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आमदार वीरेश बोरकर हाजीर हो!; पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : मनोज परब
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तशी बैठक किंवा चर्चाही झालेली नाही. तसे फेक नरेटिव्ह पसरवले गेले. मात्र, काहीजणांनी मडगावात बैठक घेऊन हा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या एक ते दीड वर्षापासून याबाबतचे कारस्थान सुरू आहे. ज्यांनी कारस्थान केले, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई केली जाईल,' असे रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी रविवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. आम्ही आमदार वीरेश बोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना आज, सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यालयात स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक, खजिनदार अजय खोलकर यांसह कार्यकारिणी सदस्य यावेळी उपस्थित होते.
मनोज परब म्हणाले, आदित्य देसाई, लिसिओ रॉनकॉन व आमदारांचे निकटवर्तीय ज्युलिअस आल्मेदाने आमदार वीरेश बोरकर यांना पुढे करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. काहीजणांनी हिंदू-ख्रिश्चन असा मुद्दा समोर आणून ब्रेनवॉशिंगचा प्रयत्न केला. ते वीरेश व माझ्यात मतभेद निर्माण करण्यात यशस्वी झाले' असेही परब यांनी सांगितले.
खजिनदार अजय खोलकर म्हणाले की, '२०२३ पासून आल्मेदा मनोज परब यांना बाजूला काढायला सांगत होता. त्याने प्रत्यक्षही मला सांगितले. तो आमदारांचा स्कीम को-ऑर्डिनेटर आहे. तो पक्षाचा नाही. त्याने सोशल मीडियात धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या. त्यामुळे त्याला आम्ही नोटीस काढली. वीरेश यांना नोटीस देण्याची प्रक्रिया दि. १६ एप्रिलपासून सुरू झाली. दि. २१ एप्रिल, दि. २९ एप्रिल आणि दि. ३ मे रोजी अंतिम स्मरणपत्रही पाठविले.
खोलकर म्हणाले, 'आमदार बोरकर यांना पक्षाकडून 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. पक्षाच्या आक्षेपानंतरही त्यांनी ज्युलियस आल्मेदा यांच्याशी कथित संबंध कायम ठेवल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली. आज, वीरेशना कार्यालयात बोलावले आहे. विरेश यांनी पक्षाच्या अनेक कार्यकारिणी समिती (सीईसी) बैठकादेखील टाळल्या.
मनोज परब म्हणाले की, 'आता निवडणूक आली आहे. त्यासाठी काहीजण सक्रिय झाले आहेत. त्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही ज्या मेहनतीने पक्ष उभा केला, तो लोकांच्या विश्वासावर उभा केला.
आज काही घटक पक्ष फोडायला पाहतात. धर्माच्या आधारावर विभागणी करू पाहत आहेत. हिंदू-ख्रिश्चन याविषयावर ब्रेन वॉशिंग सुरू आहे. काहींना पक्ष दुसऱ्या पद्धतीने चालवायचा आहे. ते आम्ही होऊ देणार नाही', असे मनोज यांनी स्पष्ट केले.
मनोज परब म्हणाले की, 'ज्युलिअस आल्मेदाने केलेल्या कारवायांबाबत प्रत्येकवेळी आम्ही वीरेशकडे विषय मांडला. पक्ष ताब्यात घेण्यासाठी आमदारांचा नवा लीगल अॅडव्हायजर आदित्य देसाई प्रयत्न करीत आहे. हे कारस्थान दीड ते दोन वर्षांपासून सुरू आहे. माझ्याबद्दल अपप्रचार केला.
पक्षाच्या २०२४ आणि २०२५ मध्ये सीईसी बैठका झाल्या. त्याला वीरेश उपस्थित राहिले नाहीत. आदित्य देसाईने बनावट सोशल मीडिया पेजीसमधून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
मी वीरेशसमोर पाचवेळा रडलो...
मनोज परब म्हणाले की, 'आरजीकडून सुरू असलेल्या एका चौकशीदरम्यान, सांतआंद्रे ब्लॉक कमिटीने आमदार वीरेश यांना निवडून आणायला पक्षाची गरज नाही. त्याला आम्ही स्वतंत्र म्हणूनही निवडून आणू शकतो अशी भाषा वापरली.
मात्र, पक्ष हाच सर्वोच्च आहे. ज्या चिन्हावर आमदार निवडून आले, ते चिन्ह मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. पोलिसांचे गुन्हे अंगावर घेतले. मात्र, काहीजणांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मी हे थांबविण्यासाठी खूप प्रयत्न केले. पाचवेळा आमदारासमोर रडलो.
वीरेशना पक्षाची सूत्रे देण्यासही तयार होतो
मनोज म्हणाले, 'मी पक्षाचे अध्यक्षपद वीरेशना द्यायला तयार होतो. मी कार्यकारिणीच्या व्हॉट्सअॅप समूहावर संदेश टाकून वीरेश यांना तसे स्पष्ट सांगितले होते की, त्यांना पक्षाची जबाबदारी घ्यायची असेल तर मी पक्ष त्यांच्याकडे सोपविण्यास तयार आहे. मात्र मडगावमध्ये गुप्त बैठक घेऊन पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतरच मी फेसबुकवर भूमिका मांडली. मला कोणत्याही पदाचा मोह नाही. पदाशिवायही काम करण्यास तयार आहे.
विजयकडून शिका
मनोज परब म्हणाले, सर्व आमदार सभागृहात आपापली जबाबदारी पार पाडतात. मात्र, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे विजय सरदेसाई यांची कामगिरी विशेष ठळकपणे दिसून येते. आमचा आमदारही तसाच प्रभावी असावा अशीच आमची इच्छा असते. विरेश यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांच्या कामगिरीतून शिकण्याची गरज आहे.
आमच्यासाठी कठीण काळ विश्वेश नाईक
विश्वेश नाईक म्हणाले, 'पक्ष सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. पक्ष फोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असून, सोशल मीडियावर पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी बनावट पेजेस तयार केली जात आहेत.