IFFI 2019 poster and information booklet published | इफ्फी 2019 चे पोस्टर व माहिती पुस्तिका प्रकाशित
इफ्फी 2019 चे पोस्टर व माहिती पुस्तिका प्रकाशित

पणजी : गोव्यात येत्या नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी सर्वच आघाड्यांवर सुरू आहे. इफ्फीचे पोस्टर आणि माहिती पुस्तिकाही शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. 

टोरंटो येथे भरलेल्या 44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कॅनडातले भारतीय उच्चयुक्त विकास स्वरुप यांनी शुक्रवारी इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. त्याचवेळी इफ्फीचे पोस्टर आणि माहिती पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. त्यावेळी चित्रपट निर्मिती आणि चित्रपट महोत्सवाशीसंबंधित सुमारे साठ मान्यवर उपस्थित होते. यावेळी इफ्फीतील सहभागासह अन्य विषयांवर चर्चा झाली. इफ्फीचा यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे. त्यामुळे यावेळचा इफ्फी हा अधिक दिमाखदार होईल असे अपेक्षित आहे. इफ्फीसाठी दोनापावल येथे स्वतंत्र साधनसुविधांची निर्मिती करण्याबाबत मात्र गोव्याची सरकारी यंत्रणा कमी पडत आहे.

दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी पणजीत होणार आहे. पन्नासाव्या इफ्फीवेळी दोनापावल येथे स्वतंत्र साधनसुविधा निर्माण झालेल्या असतील असे मुख्यमंत्रीपदी असताना मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले होते. तथापि, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्याबाबतची तयारी थंडावली. दोनापावल येथील जागा पूर्वी माहिती तंत्रज्ञान खात्याकडे होती, मग ती गोवा मनोरंजन संस्थेच्या ताब्यात घेतली गेली. मात्र दोनापावल येथे कोणत्याच इफ्फीविषयक प्रकल्पाची साधी पायाभरणी सुद्धा झाली नाही.

मध्यंतरी ईडीसीने डिझाईन तयार करण्यासाठी पाऊले उचलली होती. तिथे एक हजार आसन क्षमतेचे कनवेनशन सेंटर बांधणो तसेच 300 खोल्यांचे हॉटेल बांधणे असाही प्रस्ताव होता. दरम्यान, पोस्टेज स्टँप तयार करण्यासाठी व पहिल्या दिवसाच्या कव्हरसाठी इफ्फीच्या आयोजकांनी अर्ज मागविले आहेत. इंटरनॅशनल विभागासाठी सिनेमांच्या प्रवेशिकाही आयोजकांनी मागविल्या आहेत.
 


Web Title: IFFI 2019 poster and information booklet published
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.