'आयसीजीएस अचल' देशसेवेत दाखल; भारताच्या सागरी सुरक्षेला मिळणार बळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:46 IST2026-05-11T12:45:15+5:302026-05-11T12:46:25+5:30
गोवा शिपयार्डमध्ये अत्याधुनिक गस्ती जहाजाचे अनावरण

'आयसीजीएस अचल' देशसेवेत दाखल; भारताच्या सागरी सुरक्षेला मिळणार बळ
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : भारताच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल म्हणून भारतीय तटरक्षक दलात नवीन पिढीतील जलदगती गस्ती जहाज 'आयसीजीएस अचल' अधिकृतपणे सेवेत दाखल झाले. या जहाजाचे अनावरण शनिवारी गोवा शिपयार्डमध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात आले.
अनावरण संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक (अधिग्रहण) ए. अन्बारासू (आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे उत्तर पश्चिम विभागाचे इन्स्पेक्टर जनरल टेकूर सशी कुमार, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
'अचल' या नावाचा अर्थ 'दृढ' किंवा 'अविचल' असा असून, समुद्रातील सुरक्षा आणि जीवसृष्टीचे रक्षण करण्याच्या तटरक्षक दलाच्या ठाम बांधीलकीचे ते प्रतीक मानले जात आहे.
जहाजाची वैशिष्ट्ये
हे जहाज पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, सुमारे ५१ मीटर लांबीचे आहे. त्यात ५० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असून, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांना चालना देणारे ठरले आहे. 'आयसीजीएस अचल'मध्ये प्रत्येकी ३००० किलोवॅट क्षमतेची दोन डिझेल इंजिने असून, ते २७ नॉट्स वेगाने प्रवास करू शकते.
तसेच १५०० नॉटिकल मैलांपर्यंत कार्यक्षमतेने कार्य करण्याची क्षमता त्यात आहे. जहाजात ३० मिमी सीआरएन-९१ तोफ, १२.७ मिमी स्थिरित रिमोट कंट्रोल्ड गन्स, तसेच अत्याधुनिक लक्ष्य ओळख व फायर-कंट्रोल प्रणाली बसवण्यात आली आहे. इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम आणि ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टममुळे जहाजाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढली आहे.
अनावरण होऊन देशसेवेत दाखल झालेले 'आयसीजीएस अचल' हे जहाज गुजरातमधील वाडीनार येथे तैनात करण्यात येणार असून, ते किनारी गस्त, शोथ व बचाव, तस्करीविरोधी कारवाई आणि प्रदूषण नियंत्रण मोहिमांमध्ये कार्यरत राहील.
याचे नेतृत्व कमांडंट (जेजी) नवीन कुमार करणार असून, पाच अधिकारी आणि ३४ जवान त्यावर कार्यरत असतील. या जहाजाच्या समावेशनामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.