'तुमच्या त्यागाची मला जाणीव आहे...'; सुलक्षणा सावंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना हृद्य शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:49 IST2026-04-25T10:49:17+5:302026-04-25T10:49:33+5:30
'मुख्यमंत्री म्हणून तुम्ही केवळ जबाबदाऱ्या पेलत नाही, तर राज्याच्या अपेक्षा आपल्या हृदयात जपता' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

'तुमच्या त्यागाची मला जाणीव आहे...'; सुलक्षणा सावंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना हृद्य शुभेच्छा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'तुमच्या त्यागाची मला जाणीव आहे' असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्नी सुलक्षणा यांनी वाढदिवसाच्या भावनिक शुभेच्छा दिल्या आहेत. 'मुख्यमंत्री म्हणून तुम्ही केवळ जबाबदाऱ्या पेलत नाही, तर राज्याच्या अपेक्षा आपल्या हृदयात जपता' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
शुभेच्छा संदेशात सुलक्षणा सावंत यांनी म्हटले आहे की, 'गोवा तुमच्यासाठी केवळ एक राज्य नाही, तर ते तुमचे कुटुंब आहे. मुख्यमंत्री म्हणून घेतल्या जाणाऱ्या निर्णयामागे जनतेप्रती असलेली आपुलकी प्रत्येक आणि जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते.
पत्नी म्हणून मी तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचा, ताकदीचा, दीर्घ कामाच्या तासांचा आणि न थकणाऱ्या सेवाभावाचा जवळून अनुभव घेतला आहे. जग जिथे एक समर्पित मुख्यमंत्री पाहते, तिथे मी असा माणूस पाहते जो आराम, वेळ आणि विश्रांतीचा त्याग करून योग्य गोष्टींसाठी ठाम उभा राहतो' त्यांनी नमूद केले. गोवा राज्याला तुमचा अभिमान आहे आणि मलाही आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांसह राष्ट्रीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व अनेक राष्ट्रीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
'विविध क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने गोवा अग्रेसर ठरत आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व होत असून त्यांना चांगले आरोग्य लाभो, असे पंतप्रधानांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे.
याशिवाय भाजप अध्यक्ष नितीन नबीन, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, हरयाणाचे मुख्यमंत्री नयाब सैनी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपचे केंद्रीय नेते मनोहरलाल खट्टर तसेच अन्य नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना चांगले आरोग्य तसेच गोव्याच्या जनतेची सेवा करण्यासाठीचे काम असेच पुढे ठेवावे, असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.