लईराई जत्रोत्सवाला भक्तांची अलोट गर्दी; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, काटेकोर नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:14 IST2026-04-22T08:12:51+5:302026-04-22T08:14:08+5:30
उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

लईराई जत्रोत्सवाला भक्तांची अलोट गर्दी; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, काटेकोर नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिरगाव येथील जत्रोत्सवाला मंगळवारी उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. गेल्यावर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेटके नियोजन केले. मंगळवारी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविक, व्रतस्थ धोंड तसेच सामान्य नागरिकांनी पूर्ण शिस्त पाळत देवदर्शन घेतले आणि विविध ठिकाणी भेट दिली. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी देवीचे दर्शन घेतले.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिस दल, जिल्हाधिकारी, देवस्थान समिती व इतर यंत्रणा स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या मदतीने यात्रेच्या तयारीत गुंतले आहे. यावर्षी प्रशासनाने अॅक्शन प्लान तयार केला आहे. शिस्तीत दर्शन घेणे शक्य व्हावे यासाठी उपाययोजना केल्या आहेत. दिवसभरात राज्यातील विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच इतर राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. अनेक भक्तांनी धोंडांच्या देवीच्या पवित्र तळीत स्नान करून देवीचा आशीर्वाद घेतला व त्यानंतर देवदर्शन घेतले.
परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. परिसरात फेरी नसल्याने पूर्ण रस्ते मोकळे असून भाविकांची चांगली सोय झाल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक विजय राणे, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक व त्यांची टीम वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात गुंतलेली आहे. वाहतूक व्यवस्था, पार्किंगचेही नियोजन चांगले केल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांनी व धोंडांनी समाधान व्यक्त केले. रात्री उशिरा मोठी गर्दी झाली.
दरम्यान, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही देवीचे दर्शन घेऊन प्रत्येकाला सुख-समृद्धी लाभावी व मानवी जीवन सुंदर व्हावे यासाठी देवीची अखंड कृपादृष्टी लाभो अशा प्रकारची प्रार्थना केल्याचे सांगितले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी देवी लईराई ही सर्वांच्या भक्तांच्या हाकेला पावणारी असून तिच्या कृपेने यंदाचा उत्सव आनंदात संपन्न व्हावा व देवीची कृपा प्रत्येकावर व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी केली प्रार्थना
'जत्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या कृपेने गोमंतकीय जनतेला व सर्व मानवजातीला उत्तम आरोग्य, समृद्धी लाभावी' अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. भक्तगणांनी व धोंडांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाविकांच्या शिस्तीचे दर्शन
शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात यावर्षी प्रशासनाने अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन केल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाने मनावर घेतले तर सर्वकाही सुरळीत होऊ शकते, याची प्रचिती या व्यवस्थेतून स्पष्टपणे दिसून आली. डिचोलीचे निरीक्षक विजय राणे आणि त्यांच्या टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जत्रोत्सवात शिस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे भाविक आणि व्रतस्थ धोंडांनी कौतुक केले.