लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मागील आठवड्यात बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या सभेत एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविरोधात अपशब्द वापरल्यामुळे, त्याच्या निषेधार्थ सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी येथील भाजप कार्यालयापासून काँग्रेस कार्यालयापर्यंत रॅली काढली. या वेळी आमदार दाजी साळकर, आमदार केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, भाजपचे उपाध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर तसेच इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड. नरेंद्र सावईकर म्हणाले, "काँग्रेसने कधीच महिलांना सन्मान दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांच्या आईविरोधात खालच्या पातळीवर आरोप केले आहेत. ही काँग्रेसची संस्कृती आहे. राहुल गांधींना फक्त भाजपवर आरोप करता येतात; त्यांना देशाच्या विकासाची किंवा जनतेविषयी काहीच सहानुभूती नाही, असेही ते म्हणाले.
पोस्टरवर शाई फेकली
भाजपच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध व्यक्त करताना काँग्रेस कार्यालयाजवळील पोस्टरवर शाई फेकून आपली नाराजी दर्शविली. तसेच काँग्रेस नेत्यांविरोधात नारेबाजी केली आणि घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला.
कार्यकर्त्यांवर नियंत्रण नाही : साळकर
आमदार दाजी साळकर म्हणाले, 'मोदी विरोधी भूमिका ही काँग्रेसची सवय झाली आहे यापूर्वी सोनिया गांधी आणि इतर मोठ्या नेत्यांनीही पंतप्रधानांविषयी वाईट शब्द वापरले आहेत. आता तर हद्द झाली आहे. पंतप्रधानांच्या आईविरुद्ध वाईट शब्द वापरून काँग्रेसने आपली पातळी दाखवली आहे. आता जनता या लोकांना धडा शिकवणार आहे. काँग्रेसच्या या खालच्या पातळीच्या कृतीमुळे हा पक्ष संपत चालला आहे. पण अद्याप राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नियंत्रणात ठेवू शकत नाहीत.'