पर्सिवल नोरोन्हा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 07:50 PM2019-08-19T19:50:26+5:302019-08-19T19:50:36+5:30

गोवामुक्तीपूर्व आणि नंतरच्या काळातील चालता-बोलता इतिहास असे ज्यांचे वर्णन अतिशय योग्य ठरेल, ते मळा- पणजी येथील पर्सिवल नोरोन्हा यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

goa Astronomist Percival Noronha dies | पर्सिवल नोरोन्हा यांचे निधन

पर्सिवल नोरोन्हा यांचे निधन

Next

पणजी : गोवामुक्तीपूर्व आणि नंतरच्या काळातील चालता-बोलता इतिहास असे ज्यांचे वर्णन अतिशय योग्य ठरेल, ते मळा- पणजी येथील पर्सिवल नोरोन्हा यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. इतिहास, खगोलशास्त्र यासह अन्य अनेक विषयांत रस घेऊन संपन्न आयुष्य जगलेल्या नोरोन्हा यांचे निधन हे अनेकांना चटका लावून गेले. गोव्यातील खगोलशास्त्र प्रेमींचे मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. मृत्यूसमयी त्यांचे वय 96 होते.

पर्सिवल नोरोन्हा हे पोर्तुगीज काळात 1951 साली सरकारी सेवेत रुजू झाले होते. गोवा मुक्तीनंतर ते नागरी सेवा परीक्षेला सामोरे गेले. तिथे त्यांची निवड होऊन ते पर्यटन खात्यात क्लास वन अधिकारी म्हणून सेवा बजावून मग 1982 सालानंतर निवृत्त झाले. नोरोन्हा यांचे मळा येथील पोर्तुगीजकालीन घर हे अनेक अभ्यासकांसाठी हक्काचे स्थान होते. पोर्तुगीज काळातील इतिहास नोरोन्हा यांना तोंडपाठ होता. ते पोर्तुगीजप्रेमी असल्याचा ठपका ठेवून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांनी नोरोन्हा यांच्यावर टीका केली. मात्र नोरोन्हा यांनी आपले पोर्तुगीजप्रेम कधी लपवलेही नाही. पोर्तुगीज काळात गोवा कसा होता, पणजी शहर कसे होते हे नोरोन्हा यांच्याकडून ऐकणे म्हणजे मोठी मेजवानी असायची. गोव्याचा एकूणच इतिहास, हेरिटेज आणि खगोलशास्त्र यावर ते भरभरून बोलायचे.
 
नोरोन्हा हे मूळचे लोटली येथील होते. तथापि, त्यांच्या वडिलांनी मळा येथे स्थलांतर केल्यानंतर ते मळा येथेच स्थायिक झाले होते. नोरोन्हा अलिकडे आजारीच होते. वेर्णा येथे लुम परेरा कुटुंबीयांकडे ते राहायचे. तिथेच त्यांचे निधन झाले. ते कायम अविवाहित राहिले. गोवा सरकारच्या सेवेत प्रारंभी त्यांनी अव्वल सचिव म्हणून काम केले. उद्योग खात्यातही एकेकाळी संचालक होते. मुख्य शिष्टाचार अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. 1985 साली गोव्यात डॉ. जयंत नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय खगोल रसायन परिषद भरवली होती, तेव्हा नोरोन्हा हे खूप सक्रिय होते. पॉप सिंगर रेमो फर्नांडिससह अनेकांनी सोशल मीडियावरून नोरोन्हा यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.

Web Title: goa Astronomist Percival Noronha dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.