अखेर गौतम खट्टर कुलूमध्ये सापडला; लवकरच गोव्यात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:56 IST2026-04-25T10:55:44+5:302026-04-25T10:56:05+5:30
हिमाचल प्रदेशात कारवाई

अखेर गौतम खट्टर कुलूमध्ये सापडला; लवकरच गोव्यात आणणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करणारे गौतम खट्टर यांना अखेर कुलू हिमाचल प्रदेश येथे काल, शुक्रवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले. त्यांना लवकरच गोव्यात आणले जाणार असल्याची माहिती गोवापोलिसांनी दिली.
गोवापोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. आता त्यांना गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आपल्या ताब्यात घेणार आहे. खट्टर यांना दोन दिवसांत अटक केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
वास्को येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भगवान परशुराम जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमात गौतम खट्टरना पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते. यावेळी त्याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. त्याच्याविरोधात उत्तर व दक्षिण गोव्यात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पोलिसांना तक्रार दिली होती. तर वास्को पोलिसांनी खट्टर विरोधात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी सरकारने गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले होते.
माधव खट्टर कोठडीत
या प्रकरणाच्या तपासात गोवा पोलिसांनी खट्टरचा भाऊ माधव याला बुधवारी अटक केली होती. माधव हा गौतम यांच्यासोबत कार्यक्रमावेळी उपस्थित होता. त्याने गौतमच्या भाषणाचे रेकॉर्डिंग केले. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मंत्री माविन गुदिन्हो व दोन आमदार उपस्थित होते. गुदिन्हो यांनी गौतमचे भाषण न रोखल्याने गुरुवारी मडगाव व वास्कोत लोकांनी मोर्चा काढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.