गौतम खट्टरच्या भावाला हरिद्वारमध्ये अटक; भाषण तयार करण्यासह व्हिडिओ शूटिंगमध्ये सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:41 IST2026-04-23T09:40:11+5:302026-04-23T09:41:01+5:30
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रँचने माधव याच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करून ही कारवाई केली.

गौतम खट्टरच्या भावाला हरिद्वारमध्ये अटक; भाषण तयार करण्यासह व्हिडिओ शूटिंगमध्ये सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्य आरोपी गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला गोवापोलिसांनी हरिद्वार येथून अटक केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रँचने माधव याच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करून ही कारवाई केली.
तपासादरम्यान असे समोर आले की, वास्को येथे झालेल्या कार्यक्रमासाठी माधव हा गौतमसोबत आला होता. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ माधवनेच आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आणि नंतर तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला.
क्राईम ब्रँचने कार्यक्रमाच्या आयोजकांची चौकशी केली. यांदरम्यान त्यांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम खट्टरच्या प्रवासाचे नियोजन, निवास व्यवस्था आणि ५१ हजार रुपयांच्या मानधनाबाबत माधव खट्टर याच्याशीच चर्चा झाली होती.
लूक आऊट नोटीस जारी
गोवापोलिसांचे एक पथक गेल्या काही दिवसांपासून हरिद्वारमध्ये तळ ठोकून आहे. गौतम खट्टरच्या घरावर रात्रभर पाळत ठेवल्यानंतर बुधवारी पोलिसांनी माधव याला शोधून काढून अटक केली. त्याला आता पुढील तपासासाठी गोव्यात आणले जात आहे. दुसरीकडे, मुख्य संशयित गौतम अद्याप फरार असून तो देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी क्राईम ब्रँचने त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनला याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.