लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या स्पष्ट निर्देशानुसार पर्यटन खात्याने कळंगुट-बागा किनाऱ्यावरील १७ बेकायदेशीर शॅक्स जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. किनाऱ्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करत ही मोहीम राबवण्यात आली.
पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात झाली. संभाव्य विरोध टाळण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे दोन जेसीबींच्या साहाय्याने शॅक्स पाडण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली होती.
प्राथमिक तपासात अनेक शॅक्सची उभारणी बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. काही शॅक्सवाल्यांनी नियमबाह्य पद्धतीने विस्तार केला होता, तर काहींनी सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचेही निदर्शनास आले.
कारवाईपूर्वी संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी स्वतःहून आपले साहित्य हटवले होते. तरीही काही ठिकाणी पक्क्या स्वरूपाची बांधकामे असल्याने ती जमीनदोस्त करण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करावा लागला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आणखी दोन दिवस कारवाई
यावेळी पर्यटन खाते, पोलिस, मामलेदार, भूमापक तसेच तलाठी आदी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारचा प्रतिकार झाला नाही आणि संपूर्ण मोहीम शांततेत पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या सुरू असलेली ही कारवाई पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Web Summary : Seventeen illegal shacks on Baga beach were demolished following High Court orders. The tourism department conducted the demolition with police security. Many shacks were built illegally or violated CRZ rules. Notices were served beforehand. The operation may take two more days.
Web Summary : उच्च न्यायालय के आदेश के बाद बागा बीच पर सत्रह अवैध शैक्स ध्वस्त कर दिए गए। पर्यटन विभाग ने पुलिस सुरक्षा के साथ विध्वंस किया। कई शैक्स अवैध रूप से बनाए गए थे या सीआरजेड नियमों का उल्लंघन करते थे। पहले नोटिस दिए गए थे। कार्रवाई में दो दिन और लग सकते हैं।