अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून प्रवेशावेळी मनमानी पद्धतीने संस्थात्मक स्तरावर प्रवेश फेऱ्या राबवून देण्यात येणारे प्रवेश पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद होण्याची शक्यता आहे. यापुढे सर्वच फेऱ्यांमधील प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत राबविली जावी यासाठी नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच कॅप फेऱ्यांनंतर रिक्त राहणाऱ्या जागेवरील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांची लूट थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
खासगी वैद्यकीय महाविद्यालये एमबीबीएस, तसेच अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची अडवणूक करतात, अशा तक्रारी दरवर्षी येतात. अनेकदा कॉलेजेस प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध माध्यमांतून सीट ब्लॉक करून ठेवतात. त्यातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये येऊनही प्रवेश नाकारले जातात. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) २०२३ मध्ये परिपत्रक काढून सर्व प्रवेश प्रक्रिया ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कॅप फेऱ्यांच्या माध्यमातूनच केली जावी, असे निर्देश दिले होते.
गुणवंतांना डावलल्याचा आरोप
निर्देश दिल्यानंतरही २०२४ आणि २०२५ मध्ये खासगी वैद्यकीय कॉलेजांनी न्यायालयात जाऊन रिक्त राहिलेल्या जागांवर संस्थात्मक स्तरावर प्रवेशफेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी विशेष परवानगी मिळविली होती. यासाठी सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांचा हवाला देण्यात आला होता. त्यातून सीईटी सेलने या कॉलेजांना त्यांच्या स्तरावर मेरिट लिस्ट लावून प्रवेश देण्यास मुभा दिली होती. अशा संस्थात्मक स्तरावरील प्रवेशावेळी अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलल्याचा आरोप पालकांकडून केला जातो.
अधिक रक्कम मागितल्याच्या तक्रारी
संस्थात्मक स्तरावर प्रवेश देताना अनेकदा खासगी वैद्यकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांकडे शुल्कापेक्षा अधिक रकमेची मागणी करत असल्याच्या तक्रारी यापूर्वी पालकांनी दाखल केल्या आहेत. त्यातून वैद्यकीय अभ्यसाक्रमांची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी कॅप फेऱ्यांनंतरही रिक्त राहणाऱ्या जागा सीईटी सेलमार्फत गुणवत्ता यादी लावून भरण्याची मागणी केली जात होती. सीईटी सेलने याबाबत डीएमईआरकडे विचारणा केली होती. त्यानुसार डीएमईआरने प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल करून सर्व प्रवेश सीईटीच्या फेऱ्यांतूनच करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पालक काय म्हणतात?
संस्थात्मक स्तरावर प्रवेशावेळी काही कॉलेजेस प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात करून विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येऊ देत नाहीत. त्यातून विद्यार्थी कॉलेजला प्रवेशासाठी आलेच नाहीत असे दाखवून कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. यात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी पालकांकडून दरवर्षी होतात. संस्थात्मक स्तरावर कॉलेज भरते त्या जागा सीईटी सेलही भरू शकते. त्यामुळे सर्वच प्रवेश केवळ सीईटी सेलच्या माध्यमातूनच दिले जावेत, अशी मागणी पालक प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी केली.
Web Summary : Private medical college admissions may soon be solely through CET rounds, ending institutional quotas. A proposal aims to curb exploitation, ensuring merit-based admissions via CET Cell for vacant seats after CAP rounds.
Web Summary : निजी मेडिकल कॉलेजों में प्रवेश अब सीईटी राउंड के माध्यम से होने की संभावना है, संस्थागत कोटा समाप्त। प्रस्ताव का उद्देश्य शोषण को रोकना है, और सीएपी राउंड के बाद रिक्त सीटों के लिए सीईटी सेल के माध्यम से योग्यता-आधारित प्रवेश सुनिश्चित करना है।