दोघांना लागणार मंत्रिपदाची 'लॉटरी'; हालचालींना वेग, एक मंत्रिपद महिला आमदाराला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:46 IST2026-05-04T12:46:35+5:302026-05-04T12:46:52+5:30

एक मंत्रिपद महिला आमदाराला देण्याचे निश्चित झाले असून तसे झाल्यास दिव्या राणे किंवा डिलायला लोबो यांची वर्णी लागू शकते.

both will have to go through a lottery for ministerial posts movement speed up one ministerial post will go to a female mla | दोघांना लागणार मंत्रिपदाची 'लॉटरी'; हालचालींना वेग, एक मंत्रिपद महिला आमदाराला

दोघांना लागणार मंत्रिपदाची 'लॉटरी'; हालचालींना वेग, एक मंत्रिपद महिला आमदाराला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मंत्रिमंडळात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. २०२७ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. यातील एक मंत्रिपद महिला आमदाराला देण्याचे निश्चित झाले असून तसे झाल्यास दिव्या राणे किंवा डिलायला लोबो यांची वर्णी लागू शकते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नुकतीच दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदल आणि आगामी निवडणूक रणनीतीवरही सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर काही तासातच मंत्री विश्वजित राणे यांना आयुष हे सहावे खाते देण्यात आले. आता मंत्रिमंडळात दोघांना स्थान देण्याच्या हालचालींना गती आली आहे. कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळातील एक पद रिक्त झाले. हे रिक्त पद भरताना केवळ जागा भरणे नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक समतोल साधणे हेही सरकारसमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सध्या सुरू असलेल्या चर्चावरून असे दिसते की, मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ औपचारिक निर्णय नसून तो २०२७ च्या निवडणुकीसाठीची 'सेटिंग' ठरणार आहे. एकीकडे महिला प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे अनुभवी आणि निष्ठावंत नेत्यांना संधी देण्याचा समतोल साधणे हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांसह गोव्यातही काही संघटनात्मक फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने हे बदल केले जाऊ शकतात, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गोव्यात पक्ष संघटनेत महिलांना जास्तीत जास्त संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्याला बळकटी देण्यासाठी ३३ टक्क्यांहून अधिक पदे महिलांना दिली जाऊ शकतात. राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक बदलांसोबतच काही राज्य सरकारांमध्येही मोठे निर्णय किंवा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विधानसभेत तीन महिला आमदार असूनही एकीलाही मंत्रिपद दिले गेलेले नाही. त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळ फेरबदलात महिला चेहऱ्यांना प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डॉ. दिव्या राणे पर्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी आहेत. राणे कुटुंबाचा सत्तरी आणि डिचोली भागात मोठा प्रभाव असल्याने त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. बार्देश तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहता डिलायला लोबो यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे. त्या आमदार मायकल लोबो यांच्या पत्नी आहेत.

नव्या चेहऱ्याची चर्चा

तिसऱ्या महिला आमदार जेनिफर मोन्सेरात होत. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना तूर्त तरी मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता नाही. दुसरे मंत्रिपद नवीन चेहऱ्याला देण्यासाठी आधी मंत्रिमंडळातून एकाला वगळावे लागेल. कोणाला 'नारळ' मिळू शकतो यावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये संकल्प आमोणकर, नीलेश काब्राल आदींचा समावेश आहे.
 

Web Title : गोवा मंत्रिमंडल विस्तार: दो नए मंत्री संभव, एक स्थान महिला के लिए

Web Summary : गोवा मंत्रिमंडल में 2027 के चुनावों से पहले दो नए चेहरे शामिल हो सकते हैं, जिनमें एक महिला विधायक भी शामिल है। चर्चाओं में अनुभव और प्रतिनिधित्व को संतुलित करना शामिल है, संभावित उम्मीदवार दिव्या राणे या डिलायला लोबो हैं। संगठनात्मक बदलाव भी अपेक्षित हैं।

Web Title : Goa Cabinet Expansion: Two New Ministers Likely, One Spot for Woman

Web Summary : Goa's cabinet may see two new faces, including a woman MLA, ahead of the 2027 elections. Discussions involve balancing experience and representation, with potential candidates being Divya Rane or Delilah Lobo. Organizational changes are also expected.