कालव्यावरील बांधाचे ९० टक्के काम पूर्ण

By Admin | Updated: May 31, 2014 01:36 IST2014-05-31T01:25:36+5:302014-05-31T01:36:55+5:30

डिचोली : म्हादई पाणीवाटप लवादाच्या आदेशानुसार कळसा कालव्याच्या ठिकाणी मलप्रभेत जाणारे पाणी रोखून ठेवण्यासाठी ३१ मे पूर्वी बांध घालण्याचे काम पूर्ण करण्याच्या आदेशाची पूर्तता

90% of the work on the canal completed | कालव्यावरील बांधाचे ९० टक्के काम पूर्ण

कालव्यावरील बांधाचे ९० टक्के काम पूर्ण

 डिचोली : म्हादई पाणीवाटप लवादाच्या आदेशानुसार कळसा कालव्याच्या ठिकाणी मलप्रभेत जाणारे पाणी रोखून ठेवण्यासाठी ३१ मे पूर्वी बांध घालण्याचे काम पूर्ण करण्याच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी कर्नाटकाने लगीनघाई सुरू केली असून शुक्रवारी गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी सचिव परिमल राय यांचेही पथक पाहणीसाठी गेल्यानंतर अतिशय मंदगतीने चाललेल्या कामाबाबत कानपिचक्या दिल्यानंतर गुरुवारपासून युद्धपातळीवर बांधाचे काम चालू झाले आहे. येथे शुक्रवारी गेलेल्या पथकास बांधाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे आढळून आले. आत्माराम नाडकर्णी, सचिव परिमल राय, अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील, गोपीनाथ देसाई, सुरेश बाबू यांनी बांधाची पाहणी केली. या वेळी कर्नाटक निरावरी निगमचे अधीक्षक अभियंता शिवकुमार अशोक वासनाड, नरसन्ना अन्नावर हेही उपस्थित होते. या वेळी अवमान याचिकेविषयी नाडकर्णी यांना विचारले असता, कर्नाटकाने ३१ मे पूर्वी दोन्ही कालव्यांचे मुख बंद करण्याचे काम पूर्ण केले तर त्याबाबत आम्हाला हरकत घेण्याची गरज नाही, असे सांगितले. आज पुन्हा करणार पाहणी लवादाच्या आदेशाचा ३१ मे शेवटचा दिवस असल्याने कर्नाटकाने बांध घातला की नाही याची पाहणी करण्यासाठी गोव्याचे पथक शनिवारी पुन्हा कणकुंबीला भेट देणार असल्याचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 90% of the work on the canal completed