भयानक स्फोट ! भूसुरुंग निकामी करताना स्फोटात कांकेरमध्ये तीन जवान शहीद
By संजय तिपाले | Updated: May 2, 2026 16:07 IST2026-05-02T16:05:59+5:302026-05-02T16:07:44+5:30
एका जवानाची मृत्यूशी झुंज सुरु : माओवादमुक्तीच्या घोषणेनंतर सुरक्षा दलाला धक्का

Terrible explosion! Three soldiers martyred in Kanker in an explosion while detonating a landmine
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगड राज्य माओवादमुक्त झाल्याच्या अधिकृत घोषणेला काही दिवस उलटत नाहीत तोच, माओवाद्यांनी पेरलेल्या आईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव दल) जवानांनी आपले प्राण गमावले, तर एक जवान गंभीर जखमी आहे. छत्तीसगडच्या कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात २ मे रोजी हा स्फोट झाला.
माओवादमुक्तीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी ३१ मार्च २०२६ ची डेडलाईन दिली होती, त्यामुळे सुरक्षा दलांनी वेगाने सूत्रे फिरवून आक्रमक कारवाया केल्या, दुसऱ्या बाजूला आत्मसमर्पण योजनेद्वारे अनेक जहाल माओवादी मुख्य प्रवाहात सामील झाले. शरणागत माओवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तरच्या घनदाट जंगलात पेरुन ठेवलेली स्फोटके नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस आणि 'डीआरजी'च्या जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत 'डी-माइनिंग' मोहीम राबवत होती.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
जवानांची तुकडी सतर्कतेने स्फोटके शोधत असतानाच एका जिवंत भूसुरुंगाचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की परिसरात मोठा थरकाप उडाला. यामध्ये चार जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान डीआरजी प्रभारी सुखराम वट्टी, कृष्णा कोमरा आणि संजय गढपाले यांची प्राणज्योत मालवली. परमानंद कोमरा हे या घटनेत गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सरकारच्या घोषणेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
राज्य सरकारने ३१ मार्च रोजी छत्तीसगडला सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त घोषित केले होते. मात्र, माओवाद्यांनी यापूर्वी पेरून ठेवलेली ही स्फोटके आता सुरक्षा दलांसाठी आणि जंगलात जाणाऱ्या स्थानिक आदिवासींसाठी मोठा डोकेदुखी ठरत आहेत. पोलिस अधीक्षक निखिल राखेचा यांनी घटनेला दुजोरा दिला असून, परिसरात नाकाबंदी करून अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे.
यंत्रणा 'हाय अलर्ट'वर
एकीकडे माओवादी हिंसाचार थंडावत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे अशा गुप्त स्फोटकांमुळे जवानांचे बळी जात असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा 'हाय अलर्ट'वर आहेत.