भामरागडमध्ये दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी काढली पुरातून वाट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:18 IST2025-07-04T18:15:16+5:302025-07-04T18:18:07+5:30
गुंडेनूर, पर्लकोटा नदीवरील पुलांचे काम धिम्या गतीने : पर्यायी रस्ताही गेला वाहून, रहदारी प्रभावित

Students navigated through the flood with the help of ropes in Bhamragad!
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील गुंडेनूर, पर्लकोटा या नदीपात्रावरील पुलांचे काम संथगतीने सुरू आहे, त्यामुळे यंदादेखील परिसरातील डझनभर गावांची अडचण होईल, असा अंदाज 'लोकमत'ने वर्तविला होता. पावसाळ्यातील पहिल्याच पुरात तो खरा ठरला. भामरागडमध्ये २ जुलै रोजी अतिवृष्टी झाली, शिवाय छत्तीसगडमध्येही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहत असून गुंडेनूर नाल्यासह करमपल्लीजवळ पर्यायी मार्गही वाहून गेले. त्यामुळे दोरी टाकून त्या साहाय्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून पुरातून वाट काढल्याची चित्रफीत ३ जुलै रोजी समोर आली.
आदिवासीबहुल व दुर्गम, अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील कारमपल्ली जवळील पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे भामरागड-कोठी वाहतूक खोळंबली. गुंडेनूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, ते काम अपूर्ण असल्याने अतिदुर्गम लाहेरी पलीकडील डझनभर गावांना खळखळत्या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. छत्तीसगडमधून वाहणाऱ्या इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाले आहे. पर्लकोटा नदीच्या पुलाला लागून पाणी वाहत आहे. त्यामुळे भामरागड तालुक्याची संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक महसूल, पोलिस व नगर पंचायत सतर्कता आहे.
चक्क पुरात दुचाकी आणली उचलून
महाराष्ट्र- छत्तीसगड जोडणाऱ्या महामार्गावरील गुंडेनूर नालाही खळखळून वाहत असून या नाल्यातून दुचाकी खांद्यावर घेऊन नाला पार करतानाची चित्रफीत समोर आली आहे. त्यामुळे विदारक स्थिती चव्हाट्यावर आली. त्यावरून या भागातील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या कधी दूर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बसचाही झाला खोळंबा
- भामरागड येथून कोठीसाठी २ जुलै रोजी गेलेली राज्य परिवहन महामंडळाची बसही अडकून बसली आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरू असताना पर्यायी रस्ता तयार करण्यात आले होते.
- या कलवटाजवळ पाणी आहे. पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांसह सकाळी शाळेत येणारे विद्यार्थ्यांचाही खोळंबा झाल्याचे चित्र आहे.
शिक्षणाची वाट बिकट
गुंडेनूर नाल्याच्या पलीकडेच लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी दोरी बांधून नाला पार करतानाची चित्रफीत प्रसारित झाली आहे. यावरून या भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट किती बिकट आहे, हे समोर आले.
५ दिवसांपासून छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका
जिल्ह्यात अधून-मधून पाऊस सुरू असून नदी नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे भामरागडमधील दुर्गम, अतिदुर्गम १२ गावांतील ग्रामस्थांची मोठी अडचण झाली.