अविवाहित तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; वादावरून झाला घात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:34 IST2024-08-09T18:30:23+5:302024-08-09T18:34:02+5:30

कुरखेडा तालुक्यातील घटना : चाैकशीकरिता काहीजण ताब्यात.

Murder of an unmarried youth with a sharp weapon | अविवाहित तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; वादावरून झाला घात?

अविवाहित तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; वादावरून झाला घात?

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली
गडचिराेली : सायंकाळी घराबाहेर पडलेल्या अविवाहित तरुणाचा दुसऱ्या दिवशी पहाटे गावालगतच रस्त्यावर मृतदेह तीक्ष्ण हत्याराने खून झालेल्या स्थितीत आढळून आला. ही खळबळजनक घटना कुरखेडा तालुक्याच्या चिखली- वडेगाव मार्गावर शुक्रवार, ९ ऑगस्ट राेजी पहाटे उघडकीस आली.

जितेश भोवनदास पगडवार (२८) रा. चिखली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मृतक हा गुरूवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत ताे घरी परतला नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शाेध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शाेध घेतला जात हाेता. अखेर शुक्रवारी पहाटे चिखली- वडेगाव मार्गावर स्मशानभूमी परिसरात सिडीवर्कजवळ जितेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार असून कपडेसुद्धा रक्ताने माखलेले आढळले. याबाबत नागरिकांनी कुरखेडा पाेलिस स्टेशनला माहिती दिली. तेव्हा ठाणेदार महेंद्र वाघ यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पाेलिसांनी काही युवकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. पाेलिसांनी अज्ञात आराेपीविराेधात गुन्हा दाखल केलेला आहे. 

वादावरून झाला घात?
जितेशचा गावातील काही युवकांशी वैयक्तिक कारणावरून वाद हाेता. या वादातूनच त्याचा खून झाला असावा,  अशी कुजबुज घटनास्थळी हाेती. मात्र, सखाेल चाैकशीनंतरच या प्रकरणाचा उलगडा हाेणार आहे. त्यादृष्टीने पाेलिस तपास सुरू आहे.

Web Title: Murder of an unmarried youth with a sharp weapon