साखरा येथे तयार केली मॅट नर्सरी

By Admin | Updated: June 26, 2015 00:14 IST2015-06-26T00:14:27+5:302015-06-26T00:14:27+5:30

तालुक्यातील साखरा येथे बळीराजा शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंत्राद्वारे भात रोवणी...

Matt Nursery made at Sugar | साखरा येथे तयार केली मॅट नर्सरी

साखरा येथे तयार केली मॅट नर्सरी

गडचिरोली : तालुक्यातील साखरा येथे बळीराजा शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंत्राद्वारे भात रोवणी करण्याकरिता मॅट नर्सरी तयार करण्यात आली. शेतकऱ्यांना मॅट नर्सरी तयार करण्याबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ९० टक्के अनुदानावर भात रोवणी यंत्र, पॉवर टिलर, भात कापणी यंत्र, मळणी यंत्र, कोनोविडर आदी यंत्रांचा संच सदर गटाला मिळणार असून भात रोवणी यंत्राद्वारे करण्याकरिता पं. स. चे कृषी अधिकारी विजय चौधरी, कृषी विस्तार अधिकारी दीपक जंगले यांच्या मार्गदर्शनात मॅट नर्सरी तयार करण्यात आली.
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून बळीराजा स्वयंसहाय्यता गटाला भात रोवणी करण्याकरिता यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. खरीप हंगामात भात रोवणीकरिता मजुरांची टंचाई लक्षात घेऊन यंत्राद्वारे रोवणी केली जाणार आहे. त्यामुळेच साखरा येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी अधिकारी चौधरी व कृषी विस्तार अधिकारी जंगले यांनी भात रोवणी करण्याकरिता मॅट नर्सरीचे फायदे सांगितले. मॅट नर्सरी तयार करताना बळीराजा स्वयंसहाय्यता शेतकरी गटाचे अध्यक्ष नामदेव उंदीरवाडे, सचिव हेमंत उंदीरवाडे, गटातील सदस्य, शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Matt Nursery made at Sugar