मार्कंडा नदीपात्रातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:21+5:302021-02-05T08:54:21+5:30

मार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामाेर्शी तालुक्यातील मार्कडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पुलामुळे दरवर्षी महाशिवरात्रीच्या जत्रेदरम्यान भाविकांना ...

Markanda will complete the work of a partial bridge over the river basin | मार्कंडा नदीपात्रातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करणार

मार्कंडा नदीपात्रातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करणार

मार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामाेर्शी तालुक्यातील मार्कडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पुलामुळे दरवर्षी महाशिवरात्रीच्या जत्रेदरम्यान भाविकांना तारेवरची कसरत करत मंदिर गाठावे लागते. ही समस्या पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी नदीपात्रातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल, यासाठी आवश्यक ताे निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ना. एकनाथ शिंदे हे शनिवारपासून गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यावर मुक्कामी आहेत. शनिवारी विविध विभागाची आढावा बैठक त्यांनी घेतली. रविवारी सकाळी ना. शिंदे यांनी मार्कंडादेव तीर्थस्थळाला भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी मार्कंडेश्वराची पूजाअर्चा केली. त्यानंतर त्यांनी अपूर्ण स्थितीत असलेल्या मार्कंडेश्वराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाची पाहणी केली. नदीपात्रातील अर्धवट पुलाची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, शिवसेनेचे गडचिराेली शहर प्रमुख रामकिरीत यादव तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे छबीलदास सुरपाम आदी उपस्थित हाेते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून मार्कंडादेव तीर्थस्थळाच्या विकासासाठी आपण निधी मिळवून देऊ तसेच येथे येणाऱ्या भाविकांची गैरसाेय हाेणार नाही, असे आश्वासन ना. शिंदे यांनी दिले. दरम्यान छबीलदास सुरपाम यांनी मार्कंडेश्वराच्या मंदिराच्या कामाची विस्तृत माहिती ना. शिंदे यांना दिली.

याप्रसंगी मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनीही तेथील समस्या मांडल्या.

Web Title: Markanda will complete the work of a partial bridge over the river basin