लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली : माओवाद्यांच्या हिंसक विचारसरणीत आयुष्याची १३ वर्षे खर्ची घातल्यानंतर अखेर छत्तीसगडच्या मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्ह्यातील शेवटची सक्रिय कॅडर मानल्या जाणारी कमांडर उर्मिला उर्फ टेटकी (२८) हिने २४ एप्रिल रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. माओवाद्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, कमांडर उर्मिलाच्या शरणागतीनंतर २०२२ मध्ये उदयास आलेला मोहला-मानपूर-अंबागढ चौकी हा जिल्हा माओवादमुक्त झाला आहे. मूळची मानपूर तालुक्याच्या मुंजाल गावची रहिवासी असलेली उर्मिला केवळ १५ वर्षांची असताना जंकू नावाच्या जहाल माओवाद्याच्या संपर्कात आली. कोवळ्या वयात तिला बस्तरच्या कोयालीबेडा भागात नेऊन सशस्त्र संघटनेत भरती करण्यात आले. शस्त्र हाताळण्यापासून ते घातपाती कारवायांपर्यंतचे प्रशिक्षण तिला देण्यात आले होते. गेली १३ वर्षे ती रावघाट एरिया कमिटीत सक्रिय होती.मृत्यूला चकवा देत पायी प्रवास
उर्मिलाने आत्मसमर्पणासाठी घेतलेला निर्णय अतिशय थरारक होता. काही दिवसांपूर्वी तिने कोणतीही चाहूल लागू न देता संघटना सोडली. कोणताही शस्त्र सोबत न घेता बस्तरच्या घनदाट जंगलातून ती मानपूरच्या दिशेने पायी निघाली. एकीकडे सुरक्षा दलांची भीती आणि दुसरीकडे संघटनेकडून जिवाला असलेला धोका, अशा दुहेरी संकटात मृत्यूला चकवा देत तिने जिल्हा मुख्यालय गाठले.
जहाल कमांडर 'चंदर' अजूनही सक्रिय
उर्मिलाने चौकशीत अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. दीड महिन्यापूर्वी तिची भेट जहाल माओवादी चंदर आणि रुपी यांच्याशी झाली होती. एका चकमकीत रुपी मारली गेली, मात्र चंदर अजूनही आपल्या १०-१२ साथीदारांसह बस्तर भागात सक्रिय असल्याचे तिने सांगितले. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
'उर्मिला'च्या शीरावर होते पाच लाखांचे बक्षीस
उर्मिला ही रावघाट एरिया कमिटीची सक्रिय माओवादी सदस्य होती, या कमिटीत ती कमांडर पदावर काम करायची. तिच्या डोक्यावर पाच लाखांचे इनाम होते. तिच्या आत्मसमर्पणानंतर आता या भागात संघटनेचे जाळे खिळखिळे झाले आहे. शासनाची पुनर्वसन नीती आणि पोलिस प्रशासनाचा वाढता दबाव यामुळे नक्षल्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
Web Summary : Commander Urmila, a key Maoist cadre, surrendered to police after 13 years. Recruited at 15, she navigated deadly terrain, leaving a weakened organization behind. Another commander is still active.
Web Summary : माओवादी कमांडर उर्मिला ने 13 साल बाद पुलिस के सामने आत्मसमर्पण किया। 15 साल की उम्र में भर्ती हुई, उसने खतरनाक इलाके में सफर किया, जिससे संगठन कमजोर हो गया। एक और कमांडर अभी भी सक्रिय है।