If there was a firearm shot, then it would not have happened so sad, the sadness of Veerapati | बंदुकीची गोळी लागली असती तर एवढे दु:ख झाले नसते, वीरपत्नीची व्यथा
बंदुकीची गोळी लागली असती तर एवढे दु:ख झाले नसते, वीरपत्नीची व्यथा

गडचिरोली : नक्षलवाद्यांशी लढताना बंदुकीची गोळी लागून त्यांना वीरमरण आले असते तर एवढे दु:ख झाले नसते, पण एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ज्या पद्धतीने नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले ते अतिशय क्लेशदायक आहे. आमचे संसार उद्ध्वस्त करणा-या त्या अधिका-याला पाठीशी न घालता त्यांना निलंबित करा, आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आर्त मागणी शहीद पोलीस जवानांच्या वीरपत्नींनी केली.

गेल्या १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरूंग स्फोटात कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्या अधिनस्थ असलेल्या क्युआरटी पथकातील १५ जवान आणि त्यांना घेऊन जाणा-या खासगी मालवाहू वाहनाच्या चालकाला वीरमरण आले. त्या वेदनादायी घटनेच्या १५ दिवसानंतर दु:खातून थोडे स्वत:ला सावरत आठ शहीद जवानांच्या वीरपत्नी व एका जवानाच्या बहिणीसह इतर कुटुंबियांनी गुरूवारी (१६) पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. परंतु पोलीस अधीक्षक मुंबईला गेले असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एसडीपीओ काळे यांच्याबद्दलच्या तीव्र भावनांना वाट मोकळी केली.

काळे यांची नुकतीच नंदुरबार येथे बदली करण्यात आली. पण त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई झाली नाही. याचा अर्थ पोलीस विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असे सदर वीरपत्नी म्हणाल्या. वास्तविक त्या शहीद जवानांच्या क्युआरटी पथकाला काही दिवसांपासून कमांडरच नव्हता. तो का नव्हता याचीही चौकशी झाली पाहीजे. नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया केल्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी पोलीस नेहमीच योग्य ती दक्षता घेतात. मग या घटनेच्या वेळी ती दक्षता का घेतली नाही? नक्षलवाद्यांनी गाड्या जाळल्यानंतर त्याचा पंचनामा करण्यासाठी तातडीने तिकडे येण्याची सूचना करणारे एसडीपीओ काळे यांना आपल्या जवानांच्या जीवाची काळजी नव्हती का? रस्ता मोकळा न करताच (बॉम्ब शोधक यंत्राने तपासून) क्यूआरटी पथकाला तातडीने बोलविण्याचे कारण काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विशेष म्हणजे ज्या मालवाहू वाहनाने क्युआरटी पथकाला नेण्यात आले ते वाहन यापूर्वीही वापरण्यात आले होते. धोकादायक परिस्थितीत असे वाहन वापरण्याची परवानगी एसडीपीओ काळे यांनी दिली कशी? याबद्दल त्यांना जाब विचारला पाहीजे असे त्या म्हणाल्या. सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास शहीदांच्या परिवाराला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ येईल, असे त्यांनी सांगितले.

बुलडाणा, यवतमाळ, नागपुरातून शहीद कुटुंबीय दाखल
आपल्या व्यथा मांडण्यासाठी आलेल्या वीरपत्नींमध्ये लिना किशोर बोभाटे रा.चुरमुरा जि.गडचिरोली, रेशमा आग्रमण राहाटे रा.तरोडा, जि.यवतमाळ, स्वाती सर्जेराव खारडे रा.देऊळगाव, जि.बुलडाणा, लिना भुपेश वालोदे रा.लाखनी, जि.भंडारा, माधुरी अमृत भदाडे रा.मौदा, जि.नागपूर, कल्पना पुरणशहा दुग्गा रा.भाकरोंडी जि.गडचिरोली, नलिनी लक्ष्मण कोडाप रा.एंगलखेडा, जि.गडचिरोली, सविता शानुदास मडावी रा.चिखली जि.गडचिरोली, मोहिनी प्रमोद भोयर रा.वडसा जि.गडचिरोली आदी वीरपत्नी तथा योगाजी हलामी रा.मोहगाव (सोनसरी) या अविवाहित जवानाची बहीण प्रभा नरेंद्र काटेंगे, त्यांची छोटी-छोटी मुले आणि कुटुंबातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

निरागस मुलांच्या चेह-यावरील भाव वेदनादायी
शहीद जवानांमध्ये सर्वच जण तरुण होते. त्यांची छोटी-छोटी मुलेही आपल्या आईचे बोट धरून मृत पित्याच्या आत्म्याला न्याय देण्याच्या मागणीसाठी भर उन्हात पोहोचली होती. त्यांच्या चेह-यावरील निरागस भाव आणि पितृप्रेमाला कायमचे मुकून त्यांना उभे आयुष्य काढावे लागणार, हे चित्र वेदनादायी होते. बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यातून आलेल्या वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांशी शुक्रवारी भेट होणार आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व मुक्कामाची व्यवस्था पोलीस विभागाने करून माणुसकीचा परिचय दिला.

- तर पोलीस दलाचे मनोबल ढासळेल
या प्रकरणात एसडीपीओ काळे यांची चूक असल्याचे स्पष्ट दिसत असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता निव्वळ बदली करून त्यांना पाठीशी घालणे हा आमच्या दु:खावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा प्रकाराने नक्षलविरोधी अभियानात जीवाची बाजी लावून लढणाºया पोलीस जवानांचे मनोबळ ढासळेल. त्यांचा विश्वास आणि मनोबल कायम ठेवण्यासाठी चुका झालेल्यांना योग्य ती शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी वीरपत्नींनी केली.


Web Title: If there was a firearm shot, then it would not have happened so sad, the sadness of Veerapati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.