Development of NP schools will be done on the land of Delhi | दिल्लीच्या धर्तीवर करणार न.प.शाळांचा विकास
दिल्लीच्या धर्तीवर करणार न.प.शाळांचा विकास

ठळक मुद्देगडचिरोली पालिकेचा पुढाकार : २० शिक्षकांसह शिक्षक समितीतील नगरसेवक करणार अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्याने गडचिरोलीतील नगर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक न.प. प्रशासनाने पाऊल उचलले असून पालिकेच्या १० शाळांमधील २० शिक्षकांसह शिक्षण समितीच्या सदस्यांची अभ्यास सहल दिल्लीला पोहोचणार आहे. दिल्ली येथील केजरीवाल सरकारने तेथील शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलविला. हा पॅटर्न प्रत्यक्ष पाहून त्यानुसार गडचिरोली शहरातील पालिकेच्या शाळांमध्ये काही सुधारणा करता येते काय, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
नगरसेवक व शिक्षकांच्या सदर अभ्यास दौऱ्यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या शिक्षण समितीची सभापती वर्षा वासुदेव बट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत न.प. शाळांच्या शैक्षणिक विकासाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. गडचिरोली शहरात नगर पालिकेच्या मराठी माध्यमांच्या १० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. मात्र जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकूल शाळा वगळता इतर सात ते आठ शाळांचा दर्जा खालावला आहे.
रामपूरी शाळेतही गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र न.प.च्या इतर शाळांची गुणवत्ता ढासळत असल्याने येथील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दरवर्षीच्या उन्हाळ्यात दारोदारी भटकंती करावी लागते.
पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम सुरू करून सोयीसुविधा वाढविल्यास तसेच प्रभावी अध्ययन व अध्यापन पध्दतीवर भर दिल्यास या शाळांकडे पालकांसह विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, असा आशावाद शिक्षण समितीच्या सभेत चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आला. त्यासाठी दिल्ली शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोयीसुविधायुक्त व आदर्श शाळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी व तेथील उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या वतीने दिल्ली येथे शैक्षणिक सहल काढण्यात येणार आहे.
शिक्षण सभापती वर्षा बट्टे यांच्यासह समितीतील सात सदस्य तसेच प्रत्येक शाळेतील दोन शिक्षक असे एकूण ३० जणांची दिल्लीवारी येत्या दोन दिवसात होणार आहे. हा शैक्षणिक अभ्यासदौरा तीन ते चार दिवसांचा राहणार असून यासाठी पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे.

शैक्षणिक परिवर्तन होणार
गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती वर्षा बट्टे तसेच मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी शहरातील न.प. शाळांचा विकास करण्याचा मानस व्यक्त केला असून या संदर्भात सभेत चर्चा झाली. दिल्ली शहरातील प्रगतशील शासकीय शाळांची पाहणी केल्यानंतर त्यातील काही उपक्रम गडचिरोलीत राबविण्यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठीच शिक्षक व नगरसेवकांचा अभ्यासदौरा दिल्ली येथे काढण्यात येणार आहे. दौºया संदर्भातील रेल्वे आरक्षण झाले असून येत्या दोन दिवसात चमू दिल्लीला रवाना होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली.

Web Title: Development of NP schools will be done on the land of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.