समक्का-सारक्का जत्रेत उसळली छत्तीसगडी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST2021-02-21T05:09:51+5:302021-02-21T05:09:51+5:30

गडचिरोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जत्रा, धार्मिक उत्सवांना परवानगी नाकारण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेशही लागू केला आहे. असे ...

A crowd of Chhattisgarh devotees thronged the Samakka-Sarakka fair | समक्का-सारक्का जत्रेत उसळली छत्तीसगडी भाविकांची गर्दी

समक्का-सारक्का जत्रेत उसळली छत्तीसगडी भाविकांची गर्दी

गडचिरोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जत्रा, धार्मिक उत्सवांना परवानगी नाकारण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेशही लागू केला आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातल्या कोर्ला गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समक्का-सारक्का देवीची जत्रा तेवढ्याच उत्साहाने भरली. यात प्रामुख्याने छत्तीसगडमधील भाविकांची संख्या जास्त होती.सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोर्ला या गावात ही जत्रा भरती. हे गाव सिरोंचा तालुक्यात असले तरी छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याची सीमाही तेथून जवळच आहे. त्यामुळे या जत्रेत तीनही राज्यातील भाविक सहभागी होतात. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे ही जत्रा भरणार नाही किंवा दरवर्षीसारखी भरणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात जत्रेतील गर्दीवर कोणताही परिणाम दिसला नाही.

गुरुवारी या जत्रेला सुरूवात झाली. पूर्णपणे आदिवासीबहुल असलेल्या या भागात कोडपा पुजारी म्हणून परिचित असलेली व्यक्ती या जत्रेचे आयोजन करत असते. यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तालुका प्रशासनाने परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे जत्रा होणार नाही म्हणून सिरोंचा तालुक्यातील लोक कमी संख्येने गेले असले तरी इंद्रावती नदीवरील पुलामुळे छत्तीसगडकडील भाविकांचा ओढा मोठ्या संख्येने होता.

आपली मनोकामना पूर्ण होण्याच्या आशेने लोक या जत्रेत येऊन समक्का-सारक्का देवीची आराधना करतात. या गावात प्रवासी वाहन जात नसल्यामुळे लोक खासगी वाहनाने जातात. जत्रेत अनेक दुकानेही लागली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी अशा गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.

Web Title: A crowd of Chhattisgarh devotees thronged the Samakka-Sarakka fair