CoronaVirus कोरोनाचे संकट पळविण्यासाठी सामूहिक पूजाअर्चनेचा प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 18:37 IST2020-04-01T18:35:29+5:302020-04-01T18:37:32+5:30
प्रशासनाचा हस्तक्षेप : एकत्रित येण्यास केली मनाई

CoronaVirus कोरोनाचे संकट पळविण्यासाठी सामूहिक पूजाअर्चनेचा प्रयत्न?
गडचिरोली : कोरोना आजाराचे संकट हा दैवी प्रकोप ठरवून तो दूर करण्यासाठी सामूहिक पुजाअर्चना करण्याचा प्रयत्न कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथे काही लोकांकडून झाला. परंतू याबाबतची कुणकुण लागताच तहसीलदारांनी पोलीस व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावकऱ्यांची समजूत काढत सामूहिक पुजा करण्यास मनाई केली.
पळसगड (सलंगटोला) येथे गावाबाहेरील डोंगरावर शंकराचे मंदिर आहे. त्या ठिकाणी सामूहिक पुजा केल्यास कोरोनाचे संकट दूर होईल अशी आवई उठविण्यात आली आणि त्यानुसार परिसरातील गावातील लोकांनाही या पुजेत सहभागी करून घ्यावे, असे काही लोकांनी सूचविले. परंतू प्रत्यक्षात तसे होण्याआधीच प्रशासनाला याची माहिती मिळाली. त्यामुळे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाºयांना गावकºयांची समजूत काढण्यासाठी पाठविले. अशा पद्धतीने एकत्रित येणे सध्या बेकायदेशिर असल्याचे निदर्शनास आणून दिले. जी काही पुजा करायची असेल ती कोणी एका-दोघांनीच करावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामूहिक पुजेचा तो बेत रद्द करण्यात आला.
दरम्यान अशा पद्धतीने गावक्ऱयांच्या मनात भिती निर्माण करून पुजेच्या नावावर अनेक लोकांना एकत्रित करणे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासोबतच अनेकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. प्रशासनाने आणि लोकांनीही पुढेही सावध राहून अशा पद्धतीचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य अॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केली. तर असा कोणताही प्रकार गावात होणारच नव्हता. केवळ त्याबाबतची अफवा पसरविण्यात आल्याचे या भागाचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.