माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
By संजय तिपाले | Updated: October 14, 2025 14:23 IST2025-10-14T14:23:16+5:302025-10-14T14:23:46+5:30
मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवणार, संविधान हाती घेणार : पत्नी ‘तारक्का’नेही केले होते आत्मसमर्पण

Big blow to Maoist movement! 60 people including Naxal leader 'Bhupati' surrender before police
गडचिरोली : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमावती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे माओवादी चळवळीचा चेहरा राहिलेला वरिष्ठ नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू अखेर गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे शरण आला. तब्बल ६० सहकाऱ्यांसह त्याने आत्मसमर्पण केल्याची खळबळजनक माहिती १४ ऑक्टोबरला सकाळी समोर आली आहे. यासंदर्भात गडचिरोली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही, पण १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शस्त्र खाली ठेऊन तो हाती संविधान घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत माओवाद मूळासकट संपवू अशी घोषणा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसहमहाराष्ट्रात आक्रमक मोहिमा सुरु आहेत. अनेक महत्त्वाचे नेते चकमकीत ठार झाले तर काहींनी शस्त्र खाली ठेवले. या पार्श्वभूमीवर माओवादी चळवळीत उभी फूट पडल्याचे देखील दिसून आले. भूपतीने युध्दबंदीचा प्रस्ताव ठेवला होता,यावरुन माओवादी चळवळीतील त्याचे केंद्रीय नेतृत्वाचे सूर जुळेनासे झाले होते. सशस्त्र संघर्ष संपवून संवादाचा मार्ग स्वीकारा, अशी भूपतीची भूमिकाच संघटनेला न पटल्याने अखेर त्याने स्वतःचा मार्ग वेगळा निवडला, अशी चर्चा सुरु झाली आहे.
संघटनेचा महासचिव थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी याने लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली, मात्र भूपतीने शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू, घटता जनाधार आणि जंगलातील अनिश्चितता पाहून जनयुद्ध आता निरर्थक ठरले, असा निष्कर्ष काढत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हालचालींची पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नाही, पण सूत्रांनुसार , भूपती आणि त्याचा गट सध्या पोलिस संरक्षणाखाली आहेत. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे.
...तर गडचिरोली होणार माओवादमुक्त
जानेवारी २०२५ मध्ये भूपतीची पत्नी व केंद्रीय समिती सदस्य विमला सिडाम उर्फ तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्कारत शस्त्र सोडून हाती संविधान घेतले. तथापि, भूपती देखील शरणागतीच्या तयारीत असल्याची चर्चा होती. अखेर त्याने ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्यामुळे दंडकारण्याच्या घनदाट जंगलात चार दशकांपासून टिकून असलेल्या माओवादी चळवळीचा हा शेवटचा टप्पा ठरू शकतो. यामुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. १० कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस भूपतीच्या शीरावर आहे. तो महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांत मोस्ट वाँटेड होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.