बँक सेवा व कर्जपुरवठा आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बँक सेवेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या गरिबांना जोपर्यंत कर्जपुरवठा व इतर बँक सेवांचा लाभ मिळत ...

Bank service and loan required | बँक सेवा व कर्जपुरवठा आवश्यक

बँक सेवा व कर्जपुरवठा आवश्यक

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : अमिर्झा येथील जीडीसीसी शाखेत साक्षरता कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बँक सेवेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या गरिबांना जोपर्यंत कर्जपुरवठा व इतर बँक सेवांचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत बँक शाखांचा विस्तार व वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अमिर्झा येथील शाखेत शनिवारी वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, शाखा व्यवस्थापक आर.पी. भोयर आदी उपस्थित होते.
उपजीविकेसाठी विविध उत्पन्न देणाºया उपक्रमांसाठी बँकांकडून कर्ज पुरवठ्याचे महत्व विशद करताना जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासन पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करताना राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांनी सकारात्मक विचार करावा, असे सांगितले. कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून जे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे लोकांमध्ये असमाधान व असंतोष आहे. याच कारणासाठी शासन पुरस्कृत योजनांतर्गत बँकांकडे पुरस्कृत केलेल्या सर्व प्रस्तावांचा मी स्वत: आढावा घेणार आहे. ज्या बँक शाखा हे काम करणार नाहीत त्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात नियुक्ती होणे म्हणजे गरीब, वंचित व ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपण पोहोचलो नाही, अशा लोकांची सेवा करण्याची संधी आहे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी जिल्हा बँकेच्या ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. बँकेने केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी बँकेचे ग्राहक, शासन पुरस्कृत योजनेचे लाभार्थी व महिला उपस्थिती होत्या.

मोबाईल व्हॅनचे प्रात्यक्षिक
याप्रसंगी बँक सेवा, विमा, किसान क्रेडिट कार्ड आणि शासन पुरस्कृत योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. नाबार्ड पुरस्कृत वित्तीय साक्षरता मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच जीवन सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

Web Title: Bank service and loan required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.