कापणीनंतर पुंजने उभारून ठेवले, रानटी हत्तींनी क्षणांत केली पिकाची राखरांगोळी; खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:23 IST2025-11-25T15:21:20+5:302025-11-25T15:23:21+5:30
आरमोरी तालुक्यातील घटना : पिकाच्या नुकसानीनंतर होते मानसिक तणावात

After harvesting, the crop was left standing in a heap, wild elephants made a trash of ashes in a moment; a frustrated farmer committed suicide
लोकमत न्यूज नेटवर्क
वडधा (गडचिरोली) : वर्षभराच्या परिश्रमाअंती अडीच एकरातील धान कापणी व बांधणीनंतर पुंजणे उभारून ठेवले असतानाच १८ नोव्हेंबरच्या रात्री रानटी हत्तींनी शेतात प्रवेश करून काही क्षणांत पिकाची राखरांगोळी केली. तोंडाशी आलेला घास हिरावल्याने नैराश्येच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आरमोरी तालुक्याच्या देलोडा बु, येथे शनिवार, २२ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता घडली. खुशाल बैजू पदा (५५) रा. देलोडा (बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रानटी हत्तींच्या कळपाने १८ नोव्हेंबर रोजी खुशाल पदा यांच्या शेतात धुमाकूळ घालत अडीच एकरातील सर्व धान पुंजणे नष्ट केले. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक काही क्षणात संपल्याने शेतकरी खुशाल पदा नैराश्येच्या गर्तेत गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढचा हंगाम कसा उभा करायचा? या तणावातून ते मानसिकदृष्ट्या खचले. याच नैराश्यातूनच त्यांनी शनिवारी रात्री ११ वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुशाल पदा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली आहेत. या घटनेमुळे पदा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिकांची नासधूस कधी थांबणार? वन विभागाकडून बघ्याची भूमिका
पोर्ला वन परिक्षेत्रात सातत्याने धान व इतर पिकांची नासधूस रानटी हत्तींकडून केली जात आहे. मात्र, वडसा वन विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे. मागील चार वर्षापासून प्रत्येकच हंगामात हत्तींकडून खुशाल पदा यांच्या पिकाची नासधूस केली जात होती. आतासुद्धा नुकसान झाल्याने नैराश्येतून पदा यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.