दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

By Admin | Updated: July 7, 2015 01:26 IST2015-07-07T01:26:52+5:302015-07-07T01:26:52+5:30

चिंतलपेठ येथील नयन दुर्गे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...

Action will be taken against the guilty employees | दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

पालकमंत्र्यांनी दिले निर्देश : संतोष आत्राम यांनी केली होती मागणी
अहेरी : चिंतलपेठ येथील नयन दुर्गे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यूथ काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष संतोष आत्राम यांनी ५ जुलै रोजी अहेरी येथे आयोजित जनता दरबारात पालकमंत्र्यांकडे केली. दरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
निर्मल भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या गावात शौचालय बांधकामासाठी खड्डे खोदण्यात आले. दरम्यान २२ जून रोजी पाण्याने भरलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन दुर्गे या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यासाठी अहेरी पं. स. चे विस्तार अधिकारी पी. आर. रायपुरे व ग्राम पंचायतीच्या सचिव संध्या गेडाम हे जबाबदार आहेत, असा आरोप संतोष आत्राम यांनी पालकंत्र्यांसमोर जनता दरबारात केला. त्यामुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आत्राम यांनी पालकमंत्री आत्राम यांच्याकडे केली.
यावेळी पालकंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी या दोनही दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच नयन दुर्गे मृत्यू प्रकरणाची पुढील चौकशी गतीने करावी, असे निर्देश उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
नयन दुर्गे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच दोषी असलेल्या पी. आर. रायपुरे व संध्या गेडाम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा न नोंदविल्यास ८ जुलैपासून अहेरीच्या एसडीओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संतोष आत्राम यांनी जनता दरबारात दिला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Action will be taken against the guilty employees