लिडकॉम-प्राडा सहकार्यामुळे कोल्हापुरी भारतीय हस्तकला जागतिक लक्झरी फॅशनच्या नकाशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 18:26 IST2026-05-04T18:24:47+5:302026-05-04T18:26:03+5:30

पारंपरिक कोल्हापुरी हस्तकलेचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांद्वारे भारतातच या सँडल्सची निर्मिती केली जाते, हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

Lidcom-Prada collaboration puts Kolhapuri Indian handicrafts on the global luxury fashion map | लिडकॉम-प्राडा सहकार्यामुळे कोल्हापुरी भारतीय हस्तकला जागतिक लक्झरी फॅशनच्या नकाशावर

लिडकॉम-प्राडा सहकार्यामुळे कोल्हापुरी भारतीय हस्तकला जागतिक लक्झरी फॅशनच्या नकाशावर

जागतिक लक्झरी फॅशन हाऊस ‘प्राडा’ने सोमवारी आपल्या ‘प्राडा मेड इन इंडिया इन्सपायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स’ या प्रकल्पाचा एक भाग म्हणून भारतीय कोल्हापुरी चपलांपासून प्रेरित असलेल्या सँडल्सचा लिमिटेड एडिशन संग्रह जगभरातील ४० निवडक प्राडा स्टोअर्समध्ये आणि आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सादर केला. पारंपरिक कोल्हापुरी हस्तकलेचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांद्वारे भारतातच या सँडल्सची निर्मिती केली जाते, हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

“ही घटना भारतीय पारंपरिक हस्तकलेसाठी आणि गेल्या अनेक दशकांपासून या कलेचे संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी कार्य करणाऱ्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे” असे ‘संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (लिडकॉम) च्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा देशभ्रतार (IAS) यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत १ मे १९७४ रोजी स्थापन झालेल्या ‘संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (लिडकॉम) संस्थेचे उद्दिष्ट राज्यातील चर्मकार आणि चर्म कारागीर समुदायाच्या सन्मान आणि उपजीविकेचे संरक्षण करणे हे आहे.

लिडकॉमचे सर्वाधिक प्रसिद्ध उत्पादन असलेली कोल्हापुरी चप्पल ही पिढ्यान्‌पिढ्या कारागिरांनी जपलेली जिवंत परंपरा आहे. या चप्पलांना २००९ मध्ये भौगोलिक निर्देशांक (GI) मानांकन प्राप्त झाले असून, या कलेच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लाँचला राष्ट्रीय अभिमानाचा क्षण संबोधताना सांगितले,“भारतीय कोल्हापुरी चपलांपासून प्रेरित हा जागतिक उपक्रम महाराष्ट्र आणि भारतासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली ही परंपरा आज जागतिक लक्झरी फॅशनचा भाग बनली असून आता जगभरातील ४० प्राडा स्टोअर्समध्ये प्रदर्शित होणारे एक जागतिक उत्पादन आहे. ‘मेड इन इंडिया’ म्हणजे काय हे महाराष्ट्राने जगाला दाखवून दिले आहे.”

या सहकार्याचा विस्तार मर्यादित कलेक्शनपुरता नसून दीर्घकालीन कौशल्य विकासावरही आधारित आहे. या करारानुसार प्राडा पुढील तीन वर्षांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIFT) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी (KILT) येथे संरचित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. या माध्यमातून कारागिरांच्या डिझाइन आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास केला जाणार असून निवडक कारागिरांना इटलीतील प्राडा अकॅडमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधी दिली जाईल.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी अगदी समर्पक शब्दात या संधीचे वर्णन केले, “आपल्या परंपरागत चपलांच्या कलेला, आपल्या मेहनती कारागिरांच्या हातांना आज खरं मानाचं स्थान मिळालं आहे. कोल्हापूरची ही कला फक्त चप्पल नाही, तर आपल्या मातीचा अभिमान आहे. सामाजिक न्याय म्हणजे माणसाला स्वावलंबन देणं, त्याच्या कष्टाला सन्मान देणं.” कारागिरांना दिलेल्या संदेशात मंत्री म्हणाले, “आणि हा सन्मान—हा गौरव आपल्या मेहनतीचा आहे, आपल्या घामाचा आहे, आपल्या परंपरेचा आहे. या कलेला जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आज आपल्या लोकांचा हा मान जगभर पोहोचला आहे” 

या सहकार्याशी परिचित असलेल्यांच्या मते, या भागीदारीचे श्रेय लिडकॉमला जाते, ज्यांनी संधी ओळखून संवाद साधला, वाटाघाटी केल्या आणि प्रत्येक अटीमध्ये कारागिरांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (IAS) यांनी सांगितले की, “ या भागीदारीचे नियोजन अत्यंत बारकाईने केले गेले. प्राडासारख्या जागतिक ब्रँडचा सहभाग, आंतरराष्ट्रीय कायदे आणि आपल्या जागतिक संबंधांची व्यापकता लक्षात घेता या गोष्टी सोप्या नव्हत्या. बौद्धिक संपत्ती हक्कांचा विचार करून या भागीदारीचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. कारागिरांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या हक्कांचे संरक्षण हेच आमचे प्रमुख ध्येय होते.”

ही भागीदारी प्राडाच्या स्प्रिंग २०२६ मेन्सवेअर सादरीकरणापश्चात सोशल मीडियावर झालेल्या चर्चेनंतर आकाराला आली. कोल्हापुरी चप्पलसारख्या डिझाइनमुळे निर्माण झालेल्या वादानंतर प्राडा प्रतिनिधीमंडळाने कोल्हापूर येथे लिडकॉम केंद्राला भेट देऊन कारागिरांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानंतर देशभ्रतार यांच्या नेतृत्वाखाली चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर सामंजस्य कराराला अंतिम रूप देण्यात आले. मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात प्राडा आणि लिडकॉम यांच्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

“ही भागीदारी भारतीय पारंपरिक हस्तकलेला शाश्वत जागतिक स्थान देईल, सांस्कृतिक संवाद वाढवेल आणि कारागिरांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती सुनिश्चित करेल” असे देशभ्रतार यांनी सांगितले. भारतीय हस्तकला क्षेत्रासाठी लिडकॉम मॉडेल एक महत्त्वपूर्ण धडा ठरतो. परंपरेचे संरक्षण करा, संस्थात्मक विश्वास निर्माण करा, सामर्थ्याने वाटाघाटी करा आणि कारागिरांचे कल्याणात कोणतीही तडजोड नाही हे तत्त्व ठेवा. यामुळेच ही भागीदारी खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरते.

Web Title : लिडकॉम-प्राडा सहयोग से कोल्हापुरी हस्तकला वैश्विक लक्जरी फैशन मानचित्र पर

Web Summary : लिडकॉम और प्राडा का सहयोग कोल्हापुरी चप्पलों को वैश्विक लक्जरी फैशन में लाता है। यह पहल स्थानीय कारीगरों का समर्थन करती है, प्रशिक्षण और अंतर्राष्ट्रीय प्रदर्शन प्रदान करती है, जिससे भारत के हस्तशिल्प क्षेत्र को बढ़ावा मिलता है।

Web Title : Kolhapuri Handicraft on Global Luxury Map Through Lidcom-Prada Collaboration

Web Summary : Prada's collaboration with Lidcom brings Kolhapuri chappals to global luxury fashion. The initiative supports local artisans, providing training and international exposure, boosting India's handicraft sector.