युवागिरी: अनुकरण सद्गुणांचे... दर्शन माणुसकीचे!; तरूण जोपासतायेत सामाजिक भान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:34 AM2019-09-10T01:34:55+5:302019-09-10T01:35:17+5:30

बुद्धीदाता, विघ्नविनाशक, विविध कलांचा अधिपती म्हणजे गणपती. त्याच्या ठायी वसलेल्या विविध गुणांमुळेच त्याला ‘गुणेशु’ असेही म्हणतात. गणरायाची हीच महती ...

Imitate the virtues of ... philosophy of humanity! | युवागिरी: अनुकरण सद्गुणांचे... दर्शन माणुसकीचे!; तरूण जोपासतायेत सामाजिक भान

युवागिरी: अनुकरण सद्गुणांचे... दर्शन माणुसकीचे!; तरूण जोपासतायेत सामाजिक भान

Next

बुद्धीदाता, विघ्नविनाशक, विविध कलांचा अधिपती म्हणजे गणपती. त्याच्या ठायी वसलेल्या विविध गुणांमुळेच त्याला ‘गुणेशु’ असेही म्हणतात. गणरायाची हीच महती लक्षात घेता समर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्लोक’ लिहिताना सुरुवातीलाच ‘गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा’ असे म्हटले आहे. युवा पिढीनेही बाप्पाचे हे सद्गुणी रूप अचूक हेरले आणि यंदा गणेशोत्सवात अनेकांनी पूरग्रस्तांना मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. युवा पिढीत दडलेली सामाजिक बांधिलकी, परोपकाराची जाणीव करून देणाऱ्या या काही बोलक्या प्रतिक्रिया...

समाजासाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटत होते. सांगली - कोल्हापूरच्या महापुरामुळे झालेले नुकसान मला पाहवत नव्हते. त्यामुळे आमच्या गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेऊन मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले. गणेशोत्सवाच्या आधी कोल्हापूरला जाऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम केले. जमेल तेवढी अर्थिक मदत व श्रमदान केले. त्यामुळे हा गणपती कायम लक्षात राहील. - अक्षय बोराडे, श्री राम महाविद्यालय, नाहूर

सद्य:स्थितीत गणपतीत मौजमजा करण्याऐवजी गरजूंना आपल्याकडून काही मदत होईल का याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मंडळाच्या दानपेटीत जे काही पैसे जमा होतील ते पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी वापरले जाणार आहेत अनेकांनी एकत्र येऊन या कार्यासाठी हातभार लावलेला आहे. - पवन चौरसिया, भवन्स महाविद्यालय, अंधेरी

या वर्षी बाप्पाचे अगदी थाटामाटात आगमन न करता खूप साध्या पद्धतीने केले. दरवर्षी आमच्या फोर्टच्या महाराजाचे आगमन पारंपरिक संस्कृतीप्रमाणे ढोल-ताशे वाजवत होते. या वेळी तसे न करता जितके पैसे वाचविता येतील तितके वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. डेकोरेशनचा देखावा नाही केला. फक्त कपड्याचे ड्रपिंग केले आहे. यातून वाचलेले पैसे पूरगस्तांना देणार आहोत. - विलास ओव्हळ, डी. वाय. पाटील कॉलेज

मी आणि माझा परिवार आम्ही आमच्या घरी दरवर्षी गणेशस्थापना करतो. तेही पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीचा. गणेशविसर्जनाच्या वेळी आम्ही डीजेसाठी लागणारा खर्च टाळून तो अनाथ आश्रमास मदत म्हणून देतो. या वर्षी आम्ही अनाथ आश्रमालाही मदत केलीच; पण, सांगलीतील गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना मदत केली. - रितिक बुट्टे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय



दरवर्षी आम्ही गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतो. प्रत्येक वर्षी मंडळातर्फे काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वेळी सांगली - कोल्हापूरकरांना पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला. म्हणून आम्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी वर्गणीत सर्व जमा झालेली रक्कम एकत्र करून त्यातून गरजेच्या वस्तू घेऊन त्या पूरग्रस्तांना मदत दिल्या. - मानव मुके, वालिया महाविद्यालय, अंधेरी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिथले लोकही आपलेच बांधव आहेत. त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण प्रत्येकाने मदत केली पाहिजे, असे मला वाटले. याच पार्श्वभूमीवर मी पूरग्रस्तांना गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य एकत्र करून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. - आशुतोष शेळके, जोशी-बेडेकर महाविद्यालय

साºया जगात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने दान करतात. तसेच मीही परिस्थितीचे भान ठेवून या वर्षी गणपतीमध्ये भेट म्हणून आलेल्या रकमेतून कोल्हापुरातील पूरग्रस्तांना नवीन कपडे घेऊन त्यांना एक छोटीशी मदत केली. त्यांच्या दु:खात त्यांना सहकार्यासाठी माझाही खारीचा वाटा असावा अशी जाण ठेवून त्यांना मदत केली. आणि यापुढेही मी माझ्या गणपतीतील आलेले पैसे वस्तूच्या स्वरूपात समाजातील गरजू व्यक्तींना देण्याचा निश्चय केला आहे. - वैभव आंद्रे, साहेबरावजी महाविद्यालय

कोल्हापूर - सांगलीला आलेल्या महापुरात पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. जीवनावश्यक मदतीशिवाय गावे पुन्हा उभारणीसाठी श्रमदानाची नितांत गरज होती. हीच गरज मी माझ्या काही साथीदारांसोबत पूर्ण केली. खूप वाईट अवस्था होती. बिकट परिस्थितीत राहून गावे स्वछ केली. एवढेच नाहीतर, गणपतीचा वायफळ खर्च टाळून त्याचा उपयोग बदलापूरला आलेल्या महापुरात पाण्यात गेलेल्या अनाथाश्रमासाठी केला. मुलांना शालेय वस्तूंचे वाटप केले. अशा माणुसकीतूनच बाप्पाचे खरे दर्शन,आशीर्वाद मिळतो. - प्रणाली पोळ,
जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर सजावटीचा कचरा जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही आज पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या कामी डोंबिवलीतील निर्मल युथ फाउंडेशन गत तीन वर्षांपासून निर्माल्य संकलनाचे काम करीत आहे.

स्वयंसेवकांसोबत साऊथ इंडियन असोसिएशन, प्रगती आणि जी.आर. पाटील महाविद्यालयाचे एनएसएसचे स्वयंसेवक निर्माल्य संकलनाचे कार्य भर पावसात गणेश विसर्जन घाटांवर करत होते. सुमारे अडीच टन निर्माल्य जमा करून गांडूळ खत बनविण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

तलाव, नदी, नाले, समुद्र इत्यादी जलाशयात निर्माल्य तसेच प्लॅस्टिक कचरा टाकल्यास प्रदूषण वाढते तसेच जलाशयातील जलचर प्राण्यांच्या शरीरात हा कचरा अडकू शकतो शिवाय त्यांच्या पर्यावरणीय अधिवासासही यामुळे धोका निर्माण होतो आणि जैवविविधता नष्ट होऊ लागते आणि सृष्टीचे चैतन्य हरवते. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात आले की घरचा अथवा मंडळाचा गणपती विसर्जित करताना निर्माल्य संकलनासाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते डोंबिवली पश्चिम भागातील कोपर, गणेश घाट, जुनी डोंबिवली, रेतीबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखाणपाडा आणि पूर्व विभागातील आयरे गाव येथे उभे होते.

(संकलन : तेजल मोहिते, काजल बच्चे, सायली सावंत)

 

Web Title: Imitate the virtues of ... philosophy of humanity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.