-प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर नऊ मेच्या माध्यान्ही तळपत्या उन्हात इतिहासाने केवळ एक पान उलटले नाही. पश्चिम बंगालच्या इतिहासात प्रथमच तृणमूल काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे सुवेंदू भगव्या पोशाखात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते झाले. त्यांचा पोशाख हे केवळ एक वस्त्र नव्हते, काँग्रेसची स्वयंसंतुष्टता, मार्क्सवाद्यांचा गैरकारभार आणि ममतांची कारस्थाने यांनी गांजलेल्या राज्याचा तो एक ठाम सांस्कृतिक कायापालट होता.
काही क्षण आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रसंगासाठी खास तयार करण्यात आलेल्या भगव्या रंगाच्या खुल्या विजयरथातून त्यांना घेऊन आले. तत्पूर्वी तामिळनाडूत कधीही पारंपरिक पोशाखात न दिसलेले राज्यपाल आर. एन. रवी भगव्या रंगाचा कुर्ता आणि बंगाली धोतर परिधान करून आले होते. संपूर्ण मंडपात भगव्या रंगाचा विशाल जनसागर पसरला होता. ध्वज फडकत होते, गमछे उसळत होते. लोकांनी कपाळावर गंध लावलेले होते. अधिकारी आणि त्यांचे पाच मंत्री भगवाच पोशाख करून आले होते. राज्याचा नवा रंग, नवी दिशा त्यातून निर्णायकपणे सूचित होत होती.
ही केवळ प्रतीकात्मकता नव्हती. बंगालची नवी अस्मिता त्यातून जाहीर होत होती. हा क्षण खेचून आणणारा जनमताचा कौलही ऐतिहासिकच. भाजपने २०७ जागा आणि ४५ टक्के मतहिस्सा मिळवणे महत्त्वाचेच. हा सांस्कृतिक विजय होता. भाजपने दूरदर्शीपणाने अचूक आणि हुकमी पावले टाकली. जे समोर दिसले त्याच्या मुळांना भाजपने गेली पंधरा वर्षे पाणी घातले.
सनातनी राष्ट्रवादासाठी पश्चिम बंगालची भूमी कायमच सुपीक होती. राजा राम मोहन राय यांच्यासारख्या बुद्धिप्रामाण्यवादी सुधारकाची ही भूमी. बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत लिहिले. अनेक पिढ्यांना या गीताने प्रेरणा दिली. ब्रिटिश राज्याला सुभाषचंद्र बोस यांच्या आक्रमक स्वातंत्र्यलढ्याने आव्हान दिले. श्री. अरविंद यांनी हिंदू अध्यात्म क्रांतिकारी रूपात प्रकट केले. स्वामी विवेकानंद हिंदुत्वाचे जागतिक दूत झाले. ‘भारताचा आत्मा अमर आहे’ अशी गर्जना त्यांनी जागतिक धर्मसभेत केली. या सर्व मातब्बर व्यक्तींनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची बीजे पेरली.
काँग्रेस, डावे पक्ष आणि नंतर तृणमूल काँग्रेसने बंगालचे रूपांतर आत्माविहीन भग्न राज्यात केले. मतांच्या राजकारणाने समाज धर्मात विभागला गेला. बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीने सीमेवरील जिल्हे धगधगते ठेवले. राज्यकर्त्यांनी हिंसाचाराला आश्रय दिल्याने गुंतवणूकदार पळून गेले. एकेकाळी औद्योगिक ऊर्जा केंद्र असलेला बंगाल भांडवलदृष्ट्या कंगाल झाला. उद्योग निघून गेले. खंडण्या तेवढ्या उरल्या. भाजपला यात संधी दिसली. गेली १५ वर्षे उपेक्षिल्या गेलेल्यांसाठी त्यांनी शांतपणे काम केले. हिंदूंना त्यांची संकटात सापडलेली पूजास्थाने भाजपने दाखवून दिली. लोकसंख्येत असाच बदल होत राहिला तर स्वतःच्या भूमीतच तुम्ही परके होऊन जाल, याची जाणीव करून दिली. संदेशखालीत घडलेल्या भयावह घटनांनी हा उद्रेक बाहेर आला. जात आणि वर्ग यांच्या पलीकडे जाऊन हिंदूंनी अभूतपूर्वरीत्या एकत्र येऊन मतदान केले. जुनी राजवट केवळ नाकारली नाही, तर नव्या राजवटीला साद घातली.
असे असले तरी कोणताही विजय कठोरतम अशी अग्निपरीक्षा समोर ठेवतो. अधिकारी सरकारला आता केवळ थातूरमातूर काम करून भागणार नाही. तळपत्या उन्हात मतदानासाठी रांगा लावणाऱ्या लाखो लोकांना आता भाकरी आणि शांतता, ठोस विकास हवा आहे. झालेल्या जखमा भरून याव्यात, असे त्यांना वाटते. त्यांना आता वंचितांना न्याय देणारे रामराज्य प्रत्यक्षात हवे आहे. अपेक्षा बऱ्याच आहेत : गुंतवणूक पुन्हा येईल, गुंडांची भीती राहणार नाही, सीमा सुरक्षित होतील, लांगुलचालन संपेल. बंगालचे बौद्धिक आणि आर्थिक पुनर्भरण होईल.
नवे सरकार रायटर्स बिल्डिंग परतून काम करणार आहे, यातला संकेतही महत्त्वाचा. ज्या ठिकाणी वसाहतवाद्यांनी आपल्या अधिसूचना काढल्या आणि नंतर क्रांतिकारींनी त्यांचे आदेश मोडले, त्या इमारतीत नवे सरकार परतत आहे. तेथे जाताना सरकारला हे जाहीर करावयाचे आहे की, बंगालची ओळख म्हणजे वसाहतीचे अवशेष नव्हती. ही डाव्यांची प्रयोगशाळा नाही.. विभिन्नतेत एकता पाहणारा जीताजागता भारत हीच या राज्याची ओळख असेल.
अर्थात, टीकाकार पुढे सरसावतीलच. काहीजण म्हणतील संस्कृतीचे भगवीकरण हे पाप होय. धर्मनिरपेक्षता संपली म्हणून काहीजण छाती पिटतील; परंतु जनादेश स्पष्ट आहे. भूतकाळाने मोडलेली वचने मतदारांनी भिरकावली आहेत. शेती कुंठित करणाऱ्या भूमीसुधारणा, संपाना आमंत्रण देणारी औद्योगिक धोरणे, अल्पसंख्याकांचे राजकारण या गोष्टींनी बहुसंख्याकांना वाटणारी चिंता दुर्लक्षित केली होती.
भगव्या शाईने इतिहास पुन्हा लिहिला गेला आहे. ही शाई बंगालच्या पुनरोदयाची संहिता लिहिते की, केवळ आरंभशूरता ठरते, हे येणारा काळ ठरवेल.
Web Summary : Bengal witnesses a cultural shift with BJP's victory. The author highlights the historical context of nationalism in Bengal and emphasizes the public's demand for development, peace, and an end to appeasement politics under the new government. Will the saffron wave bring prosperity?
Web Summary : भाजपा की जीत के साथ बंगाल में सांस्कृतिक बदलाव। लेखक बंगाल में राष्ट्रवाद के ऐतिहासिक संदर्भ और नई सरकार के तहत विकास, शांति और तुष्टिकरण की राजनीति के अंत की सार्वजनिक मांग पर जोर देते हैं। क्या भगवा लहर समृद्धि लाएगी?