-उमाकांत देशपांडे, मुंबई
राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स, चित्रपटगृहे आदी आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देणारा निर्णय उद्योग विभागाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करूनही त्याची मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. दादर, परळ, कुर्ला, सीएसटी, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांबाहेर रात्री १०-११ नंतर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गाड्याही पोलिस बंद करायला लावतात. हॉटेल्स, दुकाने, मॉल्स आदीही १० नंतर बंद होतात. बिअर बार, परमिट रूम, पब्ज रात्री दीडनंतर सुरु ठेवण्यास मनाई असूनही ते पहाटेपर्यंत सुरू राहतात.
उद्योग, व्यवसाय व आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार, पोलिस, महापालिका यंत्रणा उदासीन असून, 'नाईट लाईफ'च्या नावाखाली दारू पिऊन धिंगाणे, गर्दुल्यांचा धुमाकूळ, वेगाने गाड्या पळवणे आदी प्रकार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत सुरू आहेत.
२४ तास दुकाने सुरू ठेवण्याची चर्चा
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून, दुबई, लंडन, शांघाय, न्यूयॉर्क आदी शहरांमध्ये मॉल्स, दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू असतात. नागरिकांना रात्री तीन-चार वाजताही कपडे किंवा किराणा वस्तूंची खरेदी आरामात करता येते. त्या धर्तीवर मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दारू विक्रीची दुकाने, बिअरबार, परमिट रूम वगळता अन्य आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याचा विचार गेली काही वर्षे चर्चेत आहे.
आदित्य ठाकरेंच्या कल्पनेवर झाली होती टीका
उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईत 'नाईट लाईफ' संकल्पना मांडल्यावर गदारोळ झाला होता. मद्यविक्रीची दुकाने, बार व परमिट रूम २४ तास सुरू राहतील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, नागरिकांना त्रास होईल, अशी टीका झाल्यावर शहरातील काही विभागांमध्ये २४ तास आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा द्यावी आणि महापालिका व पोलिसांनी हे विभाग निश्चित करावेत, असे सुचवण्यात आले होते.
महायुती सरकारच्या काळातही दुकाने, मॉल्स, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला आणि उद्योग विभागाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी मद्य विक्री होत असेल, अशी दुकाने व आस्थापना वगळून अन्य बाबी २४ तास सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली.
पोलिसांकडून १२ वाजेनंतर दुकाने केली जातात बंद
यादृष्टीने विधिमंडळात प्रस्ताव आणून आवश्यक कायदेशीर दुरुस्त्याही आल्या होत्या. मंजूर करण्यात गेली अनेक वर्षे हा विषय चर्चेत असूनही व सरकारने परवानगी देऊनही मुंबईत हॉटेल्स, दुकाने, मॉल्स २४ तास सुरू नाहीत आणि पोलिस यंत्रणेकडून सर्व व्यवहार ११-१२ नंतर बंद करायला लावले जातात.
काही भागात तर मेडिकलची दुकानेही रात्री ११ नंतर बंद करण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जातात. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली दुकाने, स्टॉल्स बंद केले जातात तर काही ठिकाणी हप्ते दिल्यावर ते सुरू ठेवता येतात, असे अनेकांनी बोलून दाखविले.
प्रवाशांची होते अडचण
दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला आदी रेल्वे व बसस्थानकांमध्ये रात्री उशिरा बाहेरगावच्या गाड्या येतात व रवाना होतात. प्रवाशांना रेल्वे व बसस्थानक परिसरात रात्री उशिरा खाद्यपदार्थ व आवश्यक वस्तू उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होते.
प्रवासी व नागरिकांना हॉटेल्स व काही सुविधा रात्री उपलब्ध व्हाव्यात. व्यवसाय आणि जागतिक पातळीवरील संधीचा विचार करून नागरिकांना त्रास होणार नाही, हे तपासून २४ तास व्यवसाय कुठे सुरू ठेवता येतील, यादृष्टीने महापालिकांनी नागरी वस्तीचा परिसर वगळून शहरातील काही विभाग निश्चित करावेत आणि राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.
-अॅड. आशिष शेलार, पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा
Web Summary : Despite a 2025 order, Mumbai shops and hotels still aren't open 24/7. Police enforce closures, inconveniencing travelers. Discussions continue, but implementation lags. Nightlife concerns and logistical hurdles persist, hindering progress.
Web Summary : 2025 के आदेश के बावजूद, मुंबई में दुकानें और होटल अभी भी 24/7 खुले नहीं हैं। पुलिस बंद करवाती है, जिससे यात्रियों को असुविधा होती है। चर्चा जारी है, लेकिन कार्यान्वयन में देरी है। नाइटलाइफ़ संबंधी चिंताएँ और लॉजिस्टिक बाधाएँ बनी हुई हैं।