आजचा अग्रलेख: ‘उडता महाराष्ट्र’? तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:36 IST2026-04-16T11:32:32+5:302026-04-16T11:36:24+5:30

Maharashtra News: मुंबईसारख्या शहरांसह ग्रामीण भागात ड्रग्जच्या गंभीर प्रश्नाकडे सरकार आणि पोलिसांचे लक्ष जाण्यासाठी दोन तरुण मुलांचा मृत्यू व्हावा लागला हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू  झाला आणि राज्यातील अंमली पदार्थांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले.

Today's Editorial: 'Flying Maharashtra'? Youth in the grip of drugs... | आजचा अग्रलेख: ‘उडता महाराष्ट्र’? तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात...

आजचा अग्रलेख: ‘उडता महाराष्ट्र’? तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात...

मुंबईसारख्या शहरांसह ग्रामीण भागात ड्रग्जच्या गंभीर प्रश्नाकडे सरकार आणि पोलिसांचे लक्ष जाण्यासाठी दोन तरुण मुलांचा मृत्यू व्हावा लागला हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू  झाला आणि राज्यातील अंमली पदार्थांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. मुंबईसारख्या शहरात एका कार्यक्रमात हजारो तरुण-तरुणी एकत्र येतात, या कार्यक्रमात ड्रग्जचे खुलेआम सेवन होते आणि त्याची पुसटशी कल्पना पोलिसांना नसते यावर कोण विश्वास ठेवेल? पूर्वी मेट्रो शहरांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रग्जचे लोण आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांसह लहान शहरे आणि ग्रामीण भागात पसरले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वात जास्त प्रश्न ड्रग्जच्या सहज उपलब्धतेवर होते. ड्रग्जची सहज उपलब्धता आणि त्यामुळे बरबाद होणारी तरुण पिढी याबाबत शहरासह ग्रामीण भागातील आमदारांनीही प्रश्न उपस्थित करून या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खरे तर ६ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रातील एका आमदाराला ड्रग्जचा सुळसुळाट दिसतो, मग त्या भागातील शेकडो पोलिसांच्या नजरेतून ही बाब कशी सुटते? आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणते काळेधंदे सुरू आहेत याची पोलिसांना अनेकदा कल्पना असते, मात्र हप्ते घेऊन त्याकडे सहज दुर्लक्ष केले जाते. ड्रग्जमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे याचे गांभीर्यही या हप्ते वसुली करणाऱ्यांना नसते. ड्रगमाफियांची शिकार असतात ती शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले, त्यामुळे ड्रग्जची विक्री ही शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होत असते, मात्र पोलिस त्याकडे कानाडोळा करतात आणि त्यातूनच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी ड्रग्ज सेवनाच्या आहारी जात आहेत.

उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्राची वाटचाल ‘उडता पंजाब’च्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येते. दहा वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ड्रग्जच्या तस्करीची वर्षाला आठ ते दहा हजार प्रकरणे नोंदवली जात होती. महाराष्ट्रात सध्या हा आकडा तीन हजारच्या घरात आहे. यातून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भही सुटलेला नाही. ड्रग्जची तस्करी पूर्वी विविध देशातून हवाई अथवा समुद्रमार्गे होत होती, ही तस्करी थांबलेली नाहीच, उलट आता राज्यातच ड्रग्जचे कारखाने सुरू झाल्याने त्याची सहज उपलब्धता वाढली आहे. एखाद्या भागात ड्रग्जचा मोठा कारखाना सहज उभा राहतो, त्यातून ‘एमडी’सारख्या घातक ड्रग्जची निर्मिती होते आणि पोलिस, प्रशासन त्यावर सोयीनुसार कारवाई करते, असे सध्या महाराष्ट्रातील चित्र आहे. साताऱ्यात एका शेतात ड्रग्जचा कारखाना सुरू असतो, त्याची भनक सातारा पोलिसांना नसते, मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तिथे जाऊन कारवाई करते, हे कशाचे द्योतक?

ललित पाटील प्रकरण हे ड्रगमाफिया आणि पोलिसांचे लागेबांधे कसे होते याचे ज्वलंत आणि ताजे उदाहरण आहे. ललित पाटील नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ड्रग्जची निर्मिती करत होता आणि त्याची साठवणूक आणि वितरण पुण्यातून होत होते. या ड्रगमाफियाला पोलिस आणि ससून रुग्णालयातून मदत होत होती. हे सगळे प्रकरण समोर आल्यानंतर दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले तर काहींना निलंबित करण्यात आले. त्याला अटक झाली तेव्हा तो ससून रुग्णालयात दाखल झाला, तिथे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली आणि गंभीर बाब म्हणजे तिथूनही तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. म्हणजे ललित पाटीलची पोहच कुठपर्यंत असेल याची कल्पना केलेली बरी.

काही वर्षांपूर्वी नाशिकच्या एका आमदाराने एमडी ड्रग विकत घेऊन ते थेट विधानपरिषदेत सादर केले होते.  एका शाळेच्या बाहेर कशा पद्धतीने ड्रग विक्री सुरू आहे त्याचे फोटोही दिले होते. मात्र सरकारने कारवाई करण्याची केवळ घोषणा केली, प्रत्यक्ष कारवाई मात्र झाली नाही. एक आमदार जर पुराव्यानिशी सर्व माहिती देतो तरी त्यावर कारवाई होत नसेल तर ड्रग माफियांचे लागेबांधे कुठपर्यंत असतील? ड्रग्ज विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळत असल्याने हे माफिया पोलिसांना सहज विकत घेतात. आतापर्यंत राज्यात ड्रग्जमाफियांना मदत करणारे १६ पोलिस बडतर्फ झाले आहे, त्यावरून ड्रग्जमाफिया आणि पोलिसांचे लागेबांधे लक्षात येतील. अमरावती, अकोला, सोलापूर, नाशिक ग्रामीण, सातारा या जिल्ह्यांमध्ये ड्रग्जची प्रकरणे समोर आलेली आहेत. मात्र छुप्या पद्धतीने आणि पोलिसांच्या आशीर्वादाने ड्रग्जची विक्री आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन मुलांच्या मृत्यूने पोलिस आणि सरकारी यंत्रणेला जाग येईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यासाठी पंजाबसारखी भयानक परिस्थिती उद्भवण्याची वाट तर बघितली जात नाही ना?

Web Title : महाराष्ट्र में ड्रग्स का संकट: युवा गिरफ्त में, पुलिस उदासीनता समस्या को बढ़ावा देती है

Web Summary : दो मौतों ने महाराष्ट्र में बढ़ते ड्रग संकट को उजागर किया, जो शहरों से ग्रामीण क्षेत्रों में फैल रहा है। राजनेता पुलिस की मिलीभगत और स्कूलों के पास आसानी से उपलब्ध ड्रग्स के बारे में चिंता जताते हैं। राज्य को पंजाब की ड्रग महामारी का खतरा है, स्थानीय निर्माण समस्या को बढ़ा रहा है। पुलिस की निष्क्रियता और भ्रष्टाचार संकट को बढ़ावा देते हैं।

Web Title : Maharashtra's Drug Crisis: Youth Ensnared, Police Apathy Fuels the Problem

Web Summary : Two deaths highlight Maharashtra's escalating drug crisis, spreading from cities to rural areas. Politicians raise concerns about police complicity and readily available drugs near schools. The state risks mirroring Punjab's drug epidemic, with local manufacturing exacerbating the problem. Police inaction and corruption fuel the crisis.