शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संस्था म्हणवणाऱ्या बजबजपुरीतील स्वयंघोषित मुखंडांचा करंटेपणा... आणि दुर्भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 06:02 IST

Marathi Sahitya Sammelan: नाशकात अवकाळी आलेल्या पावसाचे सावट साहित्य संमेलनाच्या उद्घाटन-मुहूर्तावर सरले खरे; पण शहराबाहेरच्या आडगावातला हा साहित्य सोहळा अखेर संमेलनाध्यक्षांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविनाच सुरू झाला.

नाशकात अवकाळी आलेल्या पावसाचे सावट साहित्य संमेलनाच्या उद्घाटन-मुहूर्तावर सरले खरे; पण शहराबाहेरच्या आडगावातला हा साहित्य सोहळा अखेर संमेलनाध्यक्षांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविनाच सुरू झाला. अंगभूत प्रतिभेने जगाच्या अवकाशात लखलखलेली तरीही मराठी मुळांशी आजन्म बांधीलकी जपलेली जी मोजकी मराठी माणसे आहेत; त्यात डॉ. जयंत नारळीकर यांचे स्थान उत्तुंग!! डॉ. नारळीकर युरोप-अमेरिकेत मुक्काम करते आणि तिथल्या हस्तीदंती मनोऱ्यात राहाते; तर ते त्यांनी कमावलेल्या प्रतिष्ठेला साजेसेच ठरले असते; पण ते आपल्या देशात परत आले, एवढेच नव्हे; तर विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेल्या भारतासारख्या देशाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे का महत्त्वाचे आहे, हे सातत्याने सांगत राहिले. ते तिथे थांबले नाहीत. पुण्यात आयुकासारखी जागतिक कीर्तीची संस्था उभारण्यात त्यांनी आपले उत्तरायुष्य खर्ची घातले. त्यांच्यासारख्या वैज्ञानिकानेच विज्ञान-साहित्यही लिहावे, मराठी साहित्यातल्या तोवरच्या वैराण दालनात लेखक-वाचकांची वर्दळ सुरू करावी; हे तर मोठेच अप्रूप ! इतके उत्तुंग कर्तृत्व गाठीशी असताना स्वत:ची अभिजात नम्रता सांभाळण्याचा अस्सलपणा तर मराठीत दुर्मीळच !! - अशा या मीतभाषी सरस्वतीपुत्राचा (आभासी नव्हे, प्रत्यक्ष) सन्मान करण्याची संधी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाने गमावली; याचे कारण साहित्य संस्था म्हणवणाऱ्या बजबजपुरीतील स्वयंघोषित मुखंडांचा करंटेपणा !!

योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या हातात उचित मानसन्मानाची फुले पडूच द्यायची नाहीत, ही आपली राष्ट्रीय खोड ! हा देश मैदानातून निवृत्त होत असल्याच्या दिवशीच चाळिशीतल्या खेळाडूला सर्वोच्च सन्मानाचे ‘भारतरत्न’ प्रदान करण्याइतका तत्पर आहे म्हणून दाद द्यावी; तर अवघ्या ब्रह्मांडाला आपल्या स्वरवैभवाने गुंगवून टाकणाऱ्या  स्वरभास्कराच्या खांद्यावर हीच  ‘भारतरत्न’ शाल इतक्या उशिराने पडते; की जर्जर झालेल्या त्या कायेला नेमके काय चालू आहे हे कळेनासेच झालेले असते... अशा पार्श्वभूमीवर संकेत, अभिजातता, सुसंस्कृतता या कशाशी काही देणेघेणेच न उरलेल्या साहित्य संस्थांकडून तरी काय वेगळी अपेक्षा करावी? या जगातली गणितेच उफराटी. ज्यांची  ‘उपद्रव क्षमता’ मोठी आणि जातीपातीचे हुकमी एक्के उगारून मतांचे जुगाड जमवण्याची ताकद भक्कम असे कितीतरी  ‘साहित्यिक’ ऐन पन्नाशी-साठीत संमेलनाच्या अध्यक्षपदाचे मानसन्मान साग्रसंगीत उपभोगून बसले... पण अध्यक्षस्थानावरून ज्यांना ऐकण्यासाठी सामान्य मराठी माणसाने जीवाचे कान केले असते; ते फादर दिब्रिटो असोत, की डॉ. जयंत नारळीकर; यांचे पत्ते काही साहित्य महामंडळाला  ‘वेळेत’ सापडू शकले नाहीत. अर्थात हे दोघे थोडेतरी भाग्यवान ! अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोडेबाजार बंद झाला, म्हणून लोकलाजेस्तव का असेना; त्यांची नावे अध्यक्षपदाच्या यादीत आली तरी ! बिचारे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशांसारख्या साहित्यिकांना तर त्यांच्या अख्ख्या हयातीत साहित्य महामंडळाने हिंग लावून विचारले नाही- हे सारे कुठवर चालणार? त्याची लाज, किमान खंत तरी संबंधितांना वाटणार का?

वयोमानानुसार गात्रे थकल्याने प्रवासाचा, संभाव्य संसर्गाचा ताण सहन करण्यापलीकडे गेलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांची अनुपस्थिती साहित्य संमेलनाच्या इतिहासात नोंदली जाईल हे खरे, पण त्याचे तिकीट साहित्य महामंडळाच्या (आजी-माजी) निबर, अहंमन्य पदाधिकाऱ्यांच्या नावानेच फाडले गेले पाहिजे. संमेलनाध्यक्षांना रस्तामार्गे प्रवासाचा ताण नको म्हणून त्यांना चॉपरने, नंतर विमानाने नाशिकला ‘आणले’ जाण्याच्या चर्चांनाही अभिजात अगत्यापेक्षा पैशाच्या बळावर काय वाट्टेल ते जमवता येते या उर्मट बेफिकिरीचा वासच अधिक होता. या उर्मट व्यवहारांमुळेच जाणते लेखक आणि सुज्ञ वाचकही स्वत:ला अखिल भारतीय म्हणवणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनांपासून दुरावले आहेत. भपक्याचा रुबाब तेवढा मिरवणाऱ्या या मांडवातले अगत्य संपले आहे, आणि चैतन्य लोपले आहे. दरवर्षी दोन-तीन-पाच कोटी जमवू शकणारे बाहुबली यजमान शोधायचे, त्यांच्या खिशात हात घालायचे आणि वरून  त्यांनाच नैतिकतेचे धडे शिकवत बसायचे हा उपद्व्याप मराठी साहित्य महामंडळाने आतातरी बंद करावा... आणि महत्त्वाचे म्हणजे, समस्त मराठी माणसांच्या वतीने कृतज्ञतेची उबदार शाल पुण्याला जाऊन डॉ. जयंत नारळीकर यांच्या थकल्या खांद्यांवर सन्मानाने पांघरण्याची कृपा करावी, एवढीच विनंती !

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक