विशेष लेख: इराणची ‘लेडी डॉन’, जिनं अमेरिकेला चकवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:20 IST2026-04-24T11:19:30+5:302026-04-24T11:20:17+5:30
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवर शनिवारी रात्री एका महिलेला शस्त्रांसह अटक करण्यात आली आणि एकच खळबळ उडाली. केवळ अमेरिका आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण जगभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. कोण आहे ही महिला? आणि तिनं असं केलं तरी काय, ज्यामुळे जगभरात सध्या तिचा बोलबाला आहे?

विशेष लेख: इराणची ‘लेडी डॉन’, जिनं अमेरिकेला चकवलं!
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवर शनिवारी रात्री एका महिलेला शस्त्रांसह अटक करण्यात आली आणि एकच खळबळ उडाली. केवळ अमेरिका आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण जगभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. कोण आहे ही महिला? आणि तिनं असं केलं तरी काय, ज्यामुळे जगभरात सध्या तिचा बोलबाला आहे? या महिलेचं नाव आहे शमीम माफी. पण, त्याहीपेक्षा ‘लेडी डॉन’ म्हणून ती अधिक प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या डोळ्यांत धूळ फेकत गेली अनेक वर्षे तिचे कारनामे अखंड सुरू होते. इराण सरकारसाठी शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. इराणमध्ये बनवलेले बॉम्ब, ड्रोन, बॉम्ब फ्यूज आणि लाखो राउंड दारूगोळ्याशी संबंधित व्यवहारांमध्ये मुख्य दलाल म्हणून काम करीत असल्याचा तिच्यावर संशय आहे.
अतिशय पद्धतशीर आणि थंड डोक्यानं ती काम करायची. त्यातूनच तिनं एक मोठ्ठं नेटवर्क उभारलं होतं आणि त्या माध्यमातून ती शस्त्रास्त्रांची तस्करी करायची. ४४ वर्षांच्या शमीमनं इराणी बनावटीचे ड्रोन, बॉम्ब आणि लाखो टन दारूगोळा सुदानला विकल्याचा आरोप आहे.अमेरिकन अटॉर्नी बिल एसेली यांनी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, वुडलँड हिल्स येथील ४४ वर्षांच्या शमीमनं शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी अनेक कुमार्गांचा वापर केला आणि त्यातून प्रचंड पैसा कमावला.
शमीमची कहाणीही अतिशय रोमहर्षक आहे. शमीम मूळची इराणी नागरिक असून, २०१३ मध्ये तिनं आपला देश सोडला आणि २०१६ मध्ये अमेरिकेची कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी बनली. त्यानंतर हळूहळू तिनं आपलं जाळं पसरायला सुरुवात केली. राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवला आणि त्यानंतर शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या मार्गांतून ‘लेडी डॉन’ अशी तिची प्रतिमा तयार झाली.
अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा आहे की त्यांच्याकडे असलेल्या फोन रेकॉर्डनुसार डिसेंबर २०२२ ते जून २०२५ दरम्यान शमीम इराणच्या गुप्तचर आणि सुरक्षा मंत्रालयाच्या थेट संपर्कात होती. सरकारी वकिलांचं म्हणणं आहे, अशा व्यवहारांसाठी तिच्याकडे आवश्यक कायदेशीर परवानगी नव्हती.
एकीकडे तिच्यावर हे आरोप होत होते; पण, दुसरीकडे मात्र तिची सार्वजनिक प्रतिमा वेगळीच दिसत होती. तिथे ती बरीच लोकप्रिय होती. सोशल मीडियावर आपली आलिशान जीवनशैली दाखवणारे फोटो ती वारंवार शेअर करीत असे. आपले परदेशदौरे आणि महागड्या मर्सिडीज-बेन्झ रोडस्टरसह काढलेले फोटो यामुळेही सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा होती.
शस्त्रास्त्र तस्करीच्या गुन्ह्यात न्यायालयात शमीम दोषी ठरल्यास तिला फेडरल तुरुंगात जास्तीतजास्त २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तपासकर्त्यांचा आरोप आहे की शमीमनं हे व्यवहार सुलभ करण्यासाठी ओमानमध्ये नोंदणीकृत ‘एटलस इंटरनॅशनल बिझनेस’ या कंपनीचा वापर केला; यापैकी काही व्यवहार कथितपणे २०२५ पर्यंत सुरू होते.
दरम्यान, न्यायालयीन कागदपत्रांमध्ये तिचे काही व्यवहारही नमूद करण्यात आले आहेत. त्यात इराणी संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दल लॉजिस्टिक्सकडून तयार करण्यात आलेल्या Mohajer-6 सशस्त्र ड्रोनसाठी ७० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा करारही समाविष्ट आहे. हे ड्रोन आणि त्यांच्यासोबत हजारो बॉम्ब फ्यूज कथितपणे सुदानच्या संरक्षण मंत्रालयाला पुरविण्यात आले होते.