शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुखाचा शोध

By admin | Updated: January 14, 2017 01:03 IST

सतत सुखाचा शोध घेण्याची ओढ माणसाला कधी स्वस्थ बसू देत नसते. खरे तर ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे’ हे संत तुकारामांनी

सतत सुखाचा शोध घेण्याची ओढ माणसाला कधी स्वस्थ बसू देत नसते. खरे तर ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे’ हे संत तुकारामांनी बजावून ठेवले आहे. संत ज्ञानदेवांचे ‘ज्या लोकीचा चंद्रु क्षयरोगी। जेथे उदयू होय अस्तालागी। दु:ख लेवून सुखाची अंगी। सळित जगाते’ हे शब्द आणि ‘चक्रवत् परिवर्तंते सुखानीच, दु:खानिच’ हे प्राचीन वाङ्मयातले बोल कसे विसरावेत? सुख-दु:ख, निंदा-स्तुती, मऊ-कठीण, सुंदर-कुरूप, सुगंध-दुर्गंध हे चक्र अविरत असूनही सुखद तेवढेच हवे यासाठी आमची घालमेल असते. धन, मान, सत्ता, तारुण्य, आरोग्य, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यातच सुख दडले आहे असा आमचा पक्का समज असतो.क्रीडा कौशल्याने चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेले खेळाडू सुखाच्या अत्युच्च शिखरावर असतात. मात्र सामना जिंकण्यात ते जर अपयशी ठरले तर त्याच लोकांकडून झालेल्या अपमानाचा दु:खद अनुभव त्यांच्या जिव्हारी लागतो. अपार धनसंपदा असणाऱ्याला ही संपत्ती कायम राहील ना, ही चिंता जाळत असते. म्हणून हात लावीन तिथे सोने अशी मिडास स्पर्शाची हाव त्याला भुलवते. हात धुवून पाठी लागलेला काळ तारुण्याचे सुख हिरावून नेतो. दबा धरून बसलेले रोग धडधाकट शरीराला जर्जर करतात. सत्तेच्या सिंहासनावर काटेरी गादी असते. हिटलरला खऱ्या अर्थाने सुख लाभले असे म्हणता येईल का? सुखाची कल्पना सापेक्ष असते. कोणाला म्युन्सिपालिटीने चोवीस तास मुबलक पाणी दिले तरी सुख लाभते. दोन वेळ भरपेट जेवण म्हणजे कोणाला सुखाची परमावधी वाटते. बुकं शिकण्याची संधी कोणाला भाग्याची वाटते. स्वत:चे शानदार घर, पार्किंगची प्रशस्त जागा पण मुलांना खेळण्यासाठी अंगणाचे सुख नसते. दूरदर्शन, इंटरनेटच्या आभासी सुखाच्या जाळ्यात फसलेल्या मुलांमुळे वस्तीतील क्रीडांगणे ओस पडली आहेत. अभ्यासाचे सुख हरवले, त्या जागी गळेकापू स्पर्धा आली. खूप शिक्षण, लठ्ठ पगार यामागे धावण्यात मानसिक सुखे सुटत चालली.या संदर्भात रशियन बालकथांमधल्या ‘देनिसच्या गोष्टीं’ची मला तीव्रतेने आठवण येते. देनिसचे घर राजवाड्यासारखे. शाळेतून परतल्यावर तो कामावरून परतणाऱ्या आई-बाबांची कुलूपबंद दाराशी रोज वाट पाहातो. तेव्हा शेजारचा मित्र त्याला सोबत करतो. देनिसची किल्लीने धावणारी निर्जीव खेळणी मित्राला आवडतात तर मित्राची सोबत त्याला खूप भावते.एक दिवस परतल्यावर आईला सुखानी फुललेला देनिस दिसतो. उजेडाची उघडझाप करणारा मुठीतला जिवंत काजवा तो आईला दाखवतो. त्याचे धपापणे, उघडणे, मिटणे पाहण्यासाठी आपली महागडी खेळणी त्याने मित्राला दिली असतात!सुखामागे धावताना आम्ही जगण्याला मुकतो आहोत हे सांगणारी ही अर्थपूर्ण कथा आहे.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे