मराठीच्या प्रवाहातील एका दीपस्तंभाची अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:18 AM2020-05-16T04:18:48+5:302020-05-16T04:19:30+5:30

‘भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढवितो, तसेच भाषेतील शुद्धता ही त्या भाषेचे सौंदर्य वाढवित असते.’ अशा अनेक सोप्या उदाहरणांवरून त्यांनी भाषिक शुद्धतेची गरज अधोरेखित केली.

The end of a icon in the Marathi stream ... | मराठीच्या प्रवाहातील एका दीपस्तंभाची अखेर...

मराठीच्या प्रवाहातील एका दीपस्तंभाची अखेर...

Next

मराठी भाषा शुद्धलेखन चळवळीचे महाराष्ट्रातील बिनीचे शिलेदार, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे शुक्रवारी वयाच्या ६५व्या वर्षी नाशिक येथे निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. विशेष म्हणजे कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही त्यांनी उपचारानंतर व्याख्याने, मार्गदर्शनवर्ग पुन्हा सुरू केले होते.
‘भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढवितो, तसेच भाषेतील शुद्धता ही त्या भाषेचे सौंदर्य वाढवित असते.’ अशा अनेक सोप्या उदाहरणांवरून त्यांनी भाषिक शुद्धतेची गरज अधोरेखित केली.
मराठी ही सामर्थ्यवान भाषा असून, तिला स्वत:ची लेखनप्रकृती आहे. मराठी भाषेबद्दल सर्वांनाच आपुलकी आणि अभिमान असतो. मात्र, जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मराठी ज्ञानभाषा होत असताना मला मातृभाषेत शुद्ध लिहिता आले पाहिजे, ही इच्छाशक्तीही प्रत्येकाजवळ असणे गरजेचे आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. माणसांच्या स्वैर वागण्याला कायदे आणि नीतिनियम वळणावर आणतात. कारण, व्यवहारातील नियमव्यवस्थाच जर आपण नाकारली, तर त्याचे परिणाम स्वत:ला किंवा इतरांना भोगावे लागतात. त्याप्रमाणे चुकीच्या लेखनामुळे भाषेत भेसळ निर्माण होऊन समाजजीवनात अव्यवस्था आणि पर्यायाने अराजक यांना आमंत्रण दिल्यासारखे होते. म्हणून शुद्धलेखन हा आग्रह न धरता
ती महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची सवय झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती आणि या भूमिकेशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले, कार्यरत राहिले.
आपल्या राज्यात पहिली ते पदव्युत्तर ते अगदी विद्यावाचस्पती (पीएच.डी.)पर्यंत मराठी भाषा शिकविली जाते; पण मराठी कशी लिहावी, याचे ज्ञान दिले जात नाही. त्यामुळे मराठीत पदवी, पदव्युत्तर तसेच डॉक्टर झालेले अनेक वाचस्पतीही
दहा ओळी शुद्ध लिहू शकत नाहीत, अशी खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती आणि शासनाकडे शुद्धलेखनाच्या नियमावलीच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी ते प्रयत्नशील होते. ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’, ‘सोपे मराठी शुद्धलेखन’, ‘मला मराठी शिकायचंय’, ‘मराठी लेखन-कोश’ ही त्यांची मराठी भाषेवरील अप्रतिम पुस्तके विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यावाचस्पतींसह सर्वांनाच मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निधनाने सध्या दुर्मीळ होत चाललेले मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि शुद्धलेखन चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता हरविल्याची खंत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सरोजकुमार मिठारी,
वाई (जि. सातारा)

Web Title: The end of a icon in the Marathi stream ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी