प्रा. सुहृद मोरे, आयुका, पुणे
प्रा. अनिकेत सुळे, होमी भाभा केंद्र, मुंबई
मानवी संस्कृतीच्या उष:कालापासून रात्रीचे अथांग आकाश आणि त्यातील चमचमणारे तारे हे केवळ कुतूहलाचे विषय न राहता, ते आपल्या कल्पनाशक्तीचे आणि विज्ञानाच्या प्रगतीचे प्रेरणास्थान राहिले आहेत. प्रत्येकाच्याच मनात या विश्वाबद्दल एक नैसर्गिक ओढ असते. खगोलशास्त्र हे विज्ञानाचे ‘प्रवेशद्वार’ आहे. कारण ताऱ्यांबद्दल विचारताना आपण भौतिकशास्त्र, गणित, तर्कशास्त्र आणि पुराव्यांच्या जगात प्रवेश करत असतो.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अलीकडेच ऍस्ट्रॉनॉमी एज्युकेशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या “Baseline Survey of Status of Astronomy Education in India” (मौपिया माजी, सुहृद मोरे, अनिकेत सुळे, आणि इतर, २०२६) या अभ्यासाने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये असणारे खगोलशास्त्राबद्दलचे कुतूहलाचे आणि त्या विषयातील ज्ञानाच्या विसंगतीचे वास्तव चित्र समोर आणले आहे. या अभ्यासात असे आढळले की तब्बल ८६ टक्के विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रात रस आहे. ही जिज्ञासा आशादायी असली, तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या खगोलविषयक संकल्पनांत अनेक त्रुटी आहेत. हा मुद्दा एकूणच विज्ञान शिक्षणाच्या पद्धतीशी निगडित आहे.
आपल्या शिक्षण व्यवस्थेत अजूनही पाठांतराला मोठे स्थान आहे. परंतु विज्ञानाचा आत्मा कारणमीमांसेत आहे. केवळ शब्द पाठ केल्याने विज्ञानाच्या संकल्पना अवगत होत नाहीत. समस्या ‘अभ्यासक्रमात काय आहे’ यापेक्षा ‘ते कसे शिकवले जाते’ यामध्ये आहे.
या खगोलशास्त्र सर्वेक्षणातील निष्कर्ष हेच सूचित करतात. या सर्वेक्षणानुसार केवळ ६५ टक्के विद्यार्थ्यांना अवकाशीय ग्रहांच्या आकारमानाचा क्रम अचूक सांगता आला. अवकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या पृथ्वीपासूनच्या अंतराचा क्रम फक्त ३५ टक्के विद्यार्थी योग्यरीत्या लावू शकले. अनेकांना रात्री दिसणारे तारे हे आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपेक्षादेखील पृथ्वीच्या जवळ आहेत, असे वाटत असल्याचे आढळले. ही त्रुटी माहितीअभावी नाही, तर तर्क आणि परिमाणात्मक विचार विकसित न झाल्याचे दर्शवते.
केवळ ७ टक्के विद्यार्थ्यांना सर्व चंद्रकला अचूक ओळखता आल्या. चंद्राच्या कला नेमक्या कशामुळे होतात, चंद्राच्या कलांचा आकार व त्या पौर्णिमेनंतर किती दिवसांनी दिसतात, याबद्दल अनेक गैरसमज आढळून येतात. प्राथमिक इयत्तेपासून या संकल्पनांचा उल्लेख होत असताना, प्रत्यक्ष निरीक्षण न केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात चुकीची ‘मेंटल मॉडेल्स’ तयार होतात, जी पुढे विज्ञानातील इतर संकल्पनांच्या समजुतीवरदेखील परिणाम करतात. प्रकाश प्रदूषणामुळे शहरांमध्ये रात्रीच्या आकाशातील तारे दिसणे जवळपास अशक्य झाले आहे; पण चंद्राचे नियमित निरीक्षण करण्यासाठी तर प्रदूषणाची काहीच अडचण येत नाही.
आपण वर्णनात्मक व पाठांतरात्मक शिक्षणावर भर देतो; पण तर्काधिष्ठित अध्यापनाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या गैरसमजुती ओळखून त्यावर काम करण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण महत्त्वाचे. शिक्षकांमधील वैज्ञानिक संकल्पनांची स्पष्टता व त्याबरोबर साधे प्रयोग आणि चर्चाकेंद्रित अध्यापन या गोष्टींना प्रशिक्षणात महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे.
केवळ २६ टक्के विद्यार्थ्यांना दुर्बिणीतून पाहण्याची आणि २७ टक्के विद्यार्थ्यांना तारांगणाला भेट देण्याची संधी मिळाली आहे. शहरांमध्ये प्रकाशप्रदूषण, तर ग्रामीण भागात उपकरणांचा अभाव- दोन्ही परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारे मर्यादा घालतात. फिरती तारांगणे, सामुदायिक दुर्बिणी आणि स्थानिक विज्ञान क्लब यांद्वारे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाची व्याप्ती वाढवता येऊ शकते.
सुमारे २९ टक्के विद्यार्थी युट्यूबचा आधार घेतात. या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक माहितीची विश्वासार्हता तपासण्याची कौशल्ये विकसित करणे ही विज्ञान शिक्षणाचीच जबाबदारी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तथ्ये पाठ करणे नव्हे; तर पुराव्यांच्या आधारे मत बनवणे, शंका विचारणे आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे होय.
या सर्वेक्षणात काही आशादायी बाजूदेखील दिसून आल्या आहेत. अंधश्रद्धात्मक प्रसंगांवर विद्यार्थ्यांनी तर्कनिष्ठ भूमिका घेतल्याचे सर्वेक्षणात दिसते. साधन-वंचित शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्राची आवड व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांमधील ही जिज्ञासा हेच आपले खरे भांडवल आहे.
खगोलशास्त्राद्वारे विज्ञान शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा घडवून आणल्या जाऊ शकतात. न्यूटनच्या नियमापासून चंद्राच्या कलांपर्यंत, प्रत्येक संकल्पना विद्यार्थ्यांना विचार करायला, निरीक्षण करायला आणि तर्क लावायला शिकवतात. पाठांतराच्या चौकटीबाहेर जाऊन आपण संकल्पना, संवाद आणि अनुभव यांना मध्यवर्ती स्थान दिले, तर विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील ताऱ्यांचे कुतूहल केवळ चमकून न राहता, त्याचे ज्ञानाच्या प्रकाशात रूपांतर होईल.
Web Summary : Astronomy sparks curiosity, yet Indian students show knowledge gaps. Rote learning hinders understanding. Hands-on experiences, teacher training, and critical evaluation of online information are crucial for fostering logical thinking and scientific understanding through astronomy education.
Web Summary : खगोल विज्ञान जिज्ञासा जगाता है, फिर भी भारतीय छात्रों में ज्ञान की कमी है। रट्टा सीखना समझ में बाधा डालता है। खगोल विज्ञान शिक्षा के माध्यम से तार्किक सोच और वैज्ञानिक समझ को बढ़ावा देने के लिए अनुभवात्मक शिक्षा, शिक्षक प्रशिक्षण और ऑनलाइन जानकारी का आलोचनात्मक मूल्यांकन महत्वपूर्ण है।