लुइतोर ढौत देमाली नेपोना! अशी एक आसामी म्हण आहे. पारंपरिक लोकजीवनात तिचे बरेच अर्थ असले तरी एक ढोबळ अर्थ असा की, ब्रह्मपुत्रच्या लाटांना कमी लेखू नका, मोठमोठे अहंकारी डोंगर ती झटक्यात भुईसपाट करते! थोडक्यात, नम्र व्हा-मातू नका! भारतीय कसोटी सामन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत सामना खेळवला जात असताना भारतीय संघ आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उर्फ जीजी यांना ही म्हण माहिती नसेल कदाचित! पण आसामी लोक म्हणतात, अहंकारी, उर्मट माणसाचा अतिशहाणपणा वाढला की ब्रह्मपुत्र अद्दल घडवतेच! गुवाहाटी सामन्यात ४०८ धावांनी भारतीय संघाचा पराभवही हेच सांगतो. गेल्या २५ वर्षांत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर पहिल्यांदाच २-० अशी सपशेल शरणागती पत्करली. २५ वर्षांत जग किती बदलले, आज संघात असलेल्या यशस्वी जयस्वालचा जन्मही झालेला नव्हता आणि खुद्द गौतम गंभीर स्वत: रणजी सामनाही खेळलेला नव्हता. तसाही कसोटी क्रिकेट हा विषय गंभीरचा स्वत:चाही कच्चाच आहे. त्यात त्याला निवड समितीचे म्होरके असलेल्या अजित आगरकरांची साथ लाभली. या दोघांनी ठरवले, भारतीय क्रिकेटमध्ये बदल करायचे, जिंकत असलो म्हणून काय झाले?- जुने जाऊ द्या मरणालागूनी!
आगरकर स्वत:ही सतत माध्यमांना सांगतात की ‘आम्ही येत्या १५ वर्षांसाठीचा भारतीय संघ घडवत आहोत. प्रयोग करत आहोत.’ प्रयोगाला कुणाचीच ना नाही, प्रयोग फसतात हेही मान्य. पण, प्रयोग करायच्या आणि धोका पत्करायच्या नावाखाली कपाळमोक्षच करून घ्यायचे ठरवलेल्या माणसांना धूर्त धोरणी नव्हे, तर बावळट, आत्मघातकीच म्हटले जाते. जुलै २०२४ मध्ये गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाले. सदैव दुनियेवर चिडलेल्या आवेशातले हे गृहस्थ भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आले तेच कडक हेडमास्तर म्हणून. हातात काठी, शिस्तीचा बडगा! जुने यशस्वी खेळाडू त्यांना नकोसे झाले आणि विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन या मातब्बर खेळाडूंना ‘जाण्यास’ भाग पाडण्यात आले. राजा बोले, दल हले अशी ‘जी-जी’ म्हणणारी कार्यपद्धती गंभीर यांना आवडते. आपल्याच मर्जीचे अन्य प्रशिक्षक, हर्षित राणासारख्या खेळाडूंवर सतत मेहेरबानी यासह सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे संघात केवळ ऑलराऊंडर खेळवण्याचा अट्टाहास. ती गोष्ट टी-२० सामन्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरली असली तरी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात मात्र घातक ठरली.
कुठल्याच खेळाडूचे संघातले स्थान नक्की नाही की फलंदाजीचा क्रम नक्की नाही. उदा. वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमाकांपासून ते आठव्या क्रमांकापर्यंत वाट्टेल तिथे खेळवले जाऊ लागले. सुंदर हा कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर टिकून राहील असा स्पेशालिस्ट बॅटर आहे का, असा प्रश्नही पडू नये इतके हे प्रयोगप्रेम शेवटी अंगलट आले. संघातली हीच अनिश्चितता खेळाडूंनाही मारक ठरली. बाहेर जाऊन मार खात असला तरी भारतीय संघ घरच्या मैदानावर शेर आहे, हा पूर्वीच्या टिंगलचा विषयही मोडीत निघावा इतकी सपशेल शरणागती घरच्या मैदानावर पहायला मिळाली. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने हरला. इंग्लंडमधली मालिका कशीबशी राखली; पण कामगिरी सुमार दर्जाचीच होती. त्याआधी ऑस्ट्रेलियातही तेच झाले. श्रीलंकेविरुद्धही एकदिवसीय मालिकेत पराभव पाहावा लागला.
आता यावर युक्तिवाद म्हणून स्वत: गंभीरच म्हणतात की, ‘चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकलो त्याचे श्रेय नाही का माझे?’- तर श्रेय असे मागून मिळत नसते, ते मिळते कामगिरीतून आणि वर्तनातून! भारतीय क्रिकेट संघात प्रयोगाच्या नावाखाली सगळे सत्ताकेंद्रच गंभीर आणि पर्यायाने आगरकर यांच्याभोवती फिरू लागले. ज्येष्ठ खेळाडूंना अपमानजनक निवृत्ती जाहीर करावी लागली आणि नव्या खेळाडूंना टाचेखाली ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून उत्तम खेळाडूही सपशेल ढेपाळले. वातावरणच नासले. ‘पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणारच नाही’ इथपासून सर्वत्रच ‘ताठा’ दाखवण्याची वृत्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटला नव्या परिभाषेत ‘बुली’ अर्थात ‘दादा’ ठरवू लागली. भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे हे हार-जीतपेक्षा जास्त भयंकर आणि अक्षम्य आहे. दोन सामन्यांची मालिका गमावल्याच्या दु:खापेक्षाही प्रशिक्षक आणि निवड समितीचा पोकळ अहंकार सोकावण्याची वृत्ती जास्त घातक आहे. कुठलाही खेळाडू, कुठलाही प्रशिक्षक, भाईभतीजा-पर्चीवाले राजकारण याहून भारतीय क्रिकेट आणि त्यातले खिलाडू स्पिरिट जास्त मोठे आहे हे तत्त्व भारतीय क्रिकेटने आजवर जिवापाड जपले. त्यालाच नख लावणारा हा गंभीर बट्ट्याबोळ वेळीच आवरला-सावरला पाहिजे..!
Web Summary : Gautam Gambhir's coaching style, favoring all-rounders and unsettling players, led to humiliating defeats. Prioritizing ego over team spirit tarnishes Indian cricket's legacy, demanding immediate correction to prevent further damage.
Web Summary : गौतम गंभीर की कोचिंग शैली, ऑलराउंडरों को प्राथमिकता और खिलाड़ियों को अस्थिर करने से अपमानजनक हार हुई। टीम भावना से ऊपर अहंकार को प्राथमिकता देना भारतीय क्रिकेट की विरासत को धूमिल करता है, जिससे आगे नुकसान को रोकने के लिए तत्काल सुधार की आवश्यकता है।