शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्या दिव्या दीपत्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:21 IST

स्पर्धेची अंतिम फेरी दिव्या आणि कोनेरू हम्पी या दोन भारतीय खेळाडूंमध्येच झाली. 

जाॅर्जियातील बाटुमी येथे सोमवारी नवा इतिहास लिहिला गेला. नागपूरची दिव्या देशमुख हिने अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ, फिडेचे जागतिक अजिंक्यपद पटकावले. भारताचे हे पहिलेच महिला अजिंक्यपद. संपूर्ण देश हरखून गेला. देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मान्यवरांनी दिव्यावर काैतुकाचा वर्षाव केला. या महाराष्ट्रकन्येने विजेतपदासोबत अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. स्पर्धेची अंतिम फेरी दिव्या आणि कोनेरू हम्पी या दोन भारतीय खेळाडूंमध्येच झाली. 

दिव्या देशमुख हिला थेट पंधरावे मानांकन. त्यातही ती केवळ आंतरराष्ट्रीय मास्टर. बाकीच्या बहुतेक दिग्गज ग्रँडमास्टर. कोनेरी ही गेल्या पंचवीस वर्षांमधील भारताची सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू. स्पर्धेत तिला चाैथे मानांकन. तिला हरविणे हाच एक चमत्कार. परंतु, दिव्याचे यश यापुरते मर्यादित नव्हते. तिने चाैथ्या फेरीत दुसरी मानांकित झू जिनर आणि उपांत्य फेरीत तिसरी मानांकित टॅन झोंगयी या चीनच्या दिग्गज दोघींना पराभूत केले होते. स्पर्धेची उपांत्य फेरी भारत विरुद्ध चीन अशीच होती. उपउपांत्य फेरीही तशीच होती. त्या फेरीत आठजणींपैकी भारताच्या चाैघी व चीनच्या तिघी होत्या. अजिंक्यपद पटकावताच दिव्याला थेट ग्रँडमास्टर किताब बहाल झाला. त्यासाठी फिडे संघटनेचे नियमित तीन निकष तिला पार करावे लागले नाहीत. दिव्या आता कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे आणि तिचा एकूण धडाका पाहता ती पुढच्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हानवीर असेल, अशी खात्री अनेक दिग्गजांना आहे. 

अर्थात, दिव्याचे हे यश एक दिवसाचा चमत्कार नाही. जगज्जेते मुळात आकाशातून पडत नाहीत. त्यामागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या असते. ती साधना केवळ खेळाडूच लहानपणापासून करतात असे नाही, तर त्यांचे पालकही प्रचंड कष्ट उपसत असतात. खेळाडू व त्यांच्या पालकांची ही साधना खर्चीकही असते. त्यासाठी पालकांना खासगी आयुष्य, व्यवसाय बाजूला ठेवून अपत्यांना घडवावे लागते. डाॅ. जितेंद्र व डाॅ. नम्रता देशमुख हे दिव्याचे आई-वडील डाॅक्टर. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डाॅ. के. जी. देशमुख यांची दिव्या ही नात. आईने करिअर बाजूला ठेवून मुलीसाठी स्वत:ला वाहून घेतले, तर वडिलांनी व्यवसायात गुंतवून घेतले. 

दिव्याच्या जागतिक यशाने आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. सात महिन्यांपूर्वी, डिसेंबरमध्ये अठरा वर्षांच्या गुकेश डोम्माराजू याने इतिहास घडविला. चीनच्या डिंग लिरेन याला हरवून जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट पटकावणारा गुकेश बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत तरुण जगज्जेता ठरला. त्याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळविला होता. दिव्याचे फिडे जगज्जेतेपद ही गुकेशच्या सोनेरी कामगिरीची पुनरावृत्ती आहे. दोघांमध्ये अगदी विस्मयकारक अशी साम्यस्थळे आहेत. दिव्या व गुकेश दोघांचाही नागपूरशी संबंध आहे. नागपूर ही दिव्याची जन्मभूमी. चाैसष्ट घरांच्या पटावरच्या सगळ्या चालींची बाराखडी तिने इथेच गिरविली.

गुकेश चेन्नईचा असला तरी त्यानेही नागपूरच्या अकादमीत थोडे प्रशिक्षण घेतले. त्याने राष्ट्रीय स्तरावरील पहिले यशही नागपुरातच मिळविले. दोघेही विशीच्या उंबरठ्यावर आहेत. दोघांनीही  अगदी कमी वयापासून, सात-दहा वर्षांच्या आतील वयोगटातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. दोघेही आता बुद्धिबळातील सर्वोच्च स्थानी आहेत. गेल्या वर्षीच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या सांघिक यशात दोघांचेही ठळक योगदान राहिले. याचा अर्थ भारतीय बुद्धिबळाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात केवळ सुरक्षितच नाही, तर नवा इतिहास घडविण्यासाठी ही पिढी सज्ज आहे आणि जागतिक यशाच्या गेल्या तीन दशकांमधील युगाचा पाया रचणारा विश्वनाथन आनंद या स्थित्यंतराचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आनंदनंतर जागतिक अजिंक्यपद जिंकणारा गुकेश हा केवळ दुसरा भारतीय आणि दिव्याने पटकावलेले अजिंक्यपद तर भारतासाठी पहिलेच. 

कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावली, साैम्या स्वामिनाथन, वंतिका अग्रवाल किंवा सविता श्री यांना जमले नाही ते दिव्याने देशासाठी मिळविले आहे. तरुण वय, खांद्यावर भारताचा झेंडा, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यश, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सुवर्णपदकामधील योगदान आणि सर्वोच्च किताब मिळवण्याची क्षमता, तिथले स्थान टिकविण्याची जिद्द ही या दोघांची साम्यस्थळे पाहता दिव्याचे अजिंक्यपद ही भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याचा, समृद्धीचा दीपत्कार ठरतो. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ