रोबोने विद्यार्थिनीला मिठी मारली? पण खरी गोष्ट पुढे आहे; उद्या तो काय करेल अन् आपण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 08:44 IST2026-04-29T08:44:26+5:302026-04-29T08:44:53+5:30
प्रश्न रोबोने खरोखरच स्वत:हून मिठी मारली का, याचा नाही... प्रश्न आहे, उद्या तो काय करेल आणि आपण त्यासाठी तयार आहोत का?..

रोबोने विद्यार्थिनीला मिठी मारली? पण खरी गोष्ट पुढे आहे; उद्या तो काय करेल अन् आपण...
पवन देशपांडे, सहायक संपादक, लोकमत
कल्पना करा... तुम्ही एका सांस्कृतिक कार्यक्रमात बसलेले आहात. मंचावर विद्यार्थी नृत्य करत आहेत. सगळं अगदी सुरळीत चालू आहे... आणि अचानक - बाजूला काम करत असलेला रोबो विद्यार्थिनीजवळ जातो आणि तिला मिठी मारतो! क्षणभर टाळ्या थांबतात... चेहऱ्यावरचं हसू गोठतं... आणि डोक्यात एकच प्रश्न घुमतो - हे नेमकं काय झालं? बीजिंगमधील या घटनेने केवळ एक व्हायरल व्हिडीओच दिलेला नाही, तर एक मोठी चर्चा रंगवली आहे. एआय आणि रोबो आता आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहेत का?
आजचा रोबो म्हणजे केवळ लोखंड आणि वायरचा पुतळा नाही. त्याच्या ‘डोक्यात’ असते कृत्रिम बुद्धिमत्ता.. म्हणजेच एआय. रोबोला पाहायला, ऐकायला, समजून घ्यायला आणि निर्णय घ्यायला एआयच शिकवते. कॅमेरे त्याचे डोळे असतात, सेन्सर्स त्याची त्वचा असतात आणि अल्गोरिदम त्याचा मेंदू असतो. त्यामुळे तो केवळ आदेश पाळत नाही, तर परिस्थिती ओळखून प्रतिक्रिया देतो. पण इथेच सगळा खेळ आहे, कारण एआय कितीही प्रगत झाले तरी ते ‘डेटा’वर चालते. एआयला जे दिसते, जे कळते, त्यावरच त्याचा निर्णय होतो. जर त्या डेटामध्ये गोंधळ झाला, सिग्नलमध्ये व्यत्यय आला किंवा सेन्सरने चुकीची माहिती दिली तर निर्णयही चुकतो. आणि बीजिंगमध्ये नेमके तेच घडले.
कार्यक्रमादरम्यान अनेक ड्रोन उडत होते. त्यांच्या सिग्नलमुळे रोबोच्या नियंत्रणात अडथळा आला. एआयला मिळणारा इनपुट गोंधळला... आणि आउटपुट? अनपेक्षित मिठी! आता प्रश्न असा की ही केवळ तांत्रिक चूक होती का, की एआयने स्वतःहून काहीतरी केले? सोशल मीडियावर लगेच चर्चा पेटली. काहींना वाटले, एआय आता ‘मानवी वर्तन’ शिकून स्वतः निर्णय घेऊ लागले आहे. तर काहींनी स्पष्ट सांगितले की ही तांत्रिक चूक आहे. कारण, एआय अजून माणसासारखा विचार करत नाही. त्याला भावना नाहीत, हेतू नाहीत आणि जाणीव तर अजिबात नाही. पण एआय ‘शिकते’ आणि शिकताना कधी कधी अशा पद्धतीने प्रतिक्रिया देते, जी आपल्याला मानवी वाटते. म्हणूनच हा गोंधळ निर्माण होतो.
पण खरी चिंता इथे संपत नाही... ती इथूनच सुरू होते. आज आपण रोबोला नाचवतो आहोत. उद्या तो आपल्या घरात असेल. स्वयंपाक करत, वृद्धांची काळजी घेत, मुलांना शिकवत असेल. सध्याही रुग्णालयात तो ऑपरेशनमध्ये मदत करतोच, त्यात आणखी वाढ होईल. रस्त्यावर तो वाहन चालवेल. अशा वेळी जर एका छोट्या सिग्नलच्या गोंधळामुळे तो चुकीचा निर्णय घेत असेल, तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, याचा विचार करा. म्हणूनच आता एआयच्या जगात ‘स्मार्ट’ असण्यापेक्षा ‘सेफ’ असणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.
एआयला केवळ काम शिकवणे पुरेसे नाही, तर मर्यादा शिकवणे गरजेचे आहे. माणसाच्या पर्सनल स्पेसचा आदर कसा करायचा, कोणत्या परिस्थितीत थांबायचे, कोणत्या हालचाली टाळायच्या हे सगळे कोडमध्येच लिहावे लागेल. म्हणजेच, एआयमध्ये ‘एथिक्स’- नैतिक वर्तनाचे संकेत घालावे लागतील.
त्याचबरोबर, प्रत्येक रोबोवर मानवी नियंत्रणाचा एक स्तर कायम ठेवावा लागेल. ‘किल स्विच’सारख्या यंत्रणांनी एका क्षणात रोबो थांबवता आला पाहिजे. सिग्नल सिस्टम अधिक सुरक्षित करावी लागेल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी कठोर चाचण्या आणि नियम लागू करावे लागतील.
बीजिंगमधील ही मिठी कदाचित निरुपद्रवी होती. त्या विद्यार्थिनीला कोणतीही इजा झाली नाही. पण ही घटना एक इशारा आहे. एआय अजूनही शिकत आहे... आणि आपणही शिकत आहोत की, एआयसोबत कसे जगायचे? शेवटी, प्रश्न रोबोने मिठी मारली का, याचा नाही... प्रश्न आहे उद्या तो काय करेल आणि आपण त्यासाठी तयार आहोत का?..
pavan.deshpande@lokmat.com