विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 06:23 IST2026-04-22T06:22:32+5:302026-04-22T06:23:28+5:30
स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात आपण स्वत:च कसं जाऊन पडतो, याची सर्वोत्तम अनुभूती सध्या चीन घेत आहे.

विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात आपण स्वत:च कसं जाऊन पडतो, याची सर्वोत्तम अनुभूती सध्या चीन घेत आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीननं १९७९मध्ये ‘वन चाइल्ड’ पॉलिसीचा अवलंब केला होता; पण त्याचा त्यांना इतका मोठा फटका बसला की त्यातून ते आजही बाहेर आलेले नाहीत. तिथली तरुणाई ना लग्नाला तयार आहे, ना मुलं जन्माला घालायला ! आणखी नकारात्मक बाब म्हणजे आता तर तिथे घटस्फोटांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढते आहे. ज्यांची लग्नं झालेली आहेत, तेही विवाह विच्छेदन करून स्वतंत्र राहू इच्छित आहेत. विशेष म्हणजे घटस्फोट घेणाऱ्यांत महिलांचा पुढाकार खूप मोठ्या प्रमाणावर आहे. किती असावं हे प्रमाण? तब्बल सत्तर टक्के ! चीनमध्ये जे विवाह झाले किंवा होताहेत, ते झपाट्यानं तुटताहेत. ‘आम्हाला विवाह बंधनात राहायचं नाही, त्यामुळे आम्हाला घटस्फोट हवा आहे’ यासाठी न्यायालयात अर्ज केलेल्या महिलांचं प्रमाण ७० टक्के आहे.
चीनमध्ये घटस्फोट का वाढताहेत? आणि विशेषतः महिलांकडूनच घटस्फोटाची मागणी का होते आहे? -समाजशास्त्रज्ञांच्या मते महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि घटस्फोटित महिलांचा समाजाकडून झालेला सहज स्वीकार, त्याला मिळत असलेली सामाजिक मान्यता, यामुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे. दबावाखाली आयुष्य घालवण्याऐवजी नको असलेल्या नात्यांमधून बाहेर पडण्यासाठी महिला पुढाकार घेताहेत. हे घटस्फोट थांबावेत यासाठी सरकारनं घटस्फोटाची प्रक्रिया आणखी कठीण केली आहे. त्यासाठी ‘कूलिंग-ऑफ’ नियम लागू केला आहे, ज्यामुळं घटस्फोट लगेच मंजूर होत नाही. तरीसुद्धा घटस्फोटांची प्रकरणं वाढतच आहेत.
चीन सरकारनं २०२१ मध्ये ३० दिवसांचा ‘कूलिंग-ऑफ पिरिएड’ लागू केला. म्हणजेच घटस्फोट नोंदणीपूर्वी ३० दिवसांची अनिवार्य ‘विचार करण्याची मुदत’ ठेवली गेली. सुरुवातीला यामुळे घटस्फोट कमी झाले; पण नंतर ते पुन्हा वाढले. नात्यांमध्ये समानता, सन्मान आणि आवड-निवडींबाबत महिला आता आधीपेक्षा अधिक ठामपणे बोलताहेत. शांघायमधील फॅमिली लॉ वकील गुई फांगफांग सांगतात, ‘पूर्वी महिला घटस्फोटासाठी प्रामुख्यानं आपल्यावरील अत्याचारांचा दाखला द्यायच्या. जसं की, घरगुती हिंसा, विवाहबाह्य संबंध किंवा जुगारासारख्या गैरजबाबदार सवयी. आता विवाह विच्छेदनासाठी महिला कारणं देतात, ‘लग्नाची गुणवत्ता चांगली नाही’ किंवा ‘आमची मतं, मूल्यं जुळत नाहीत..’
अधिकृत आकडेवारीनुसार २०२५ मध्ये परस्पर संमतीनं झालेल्या घटस्फोटांची संख्या गेल्या ५ वर्षांतील सर्वाधिक होती, ज्यात २७ लाखांहून अधिक घटस्फोट नोंदवले गेले. २०२१च्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्क्यांनी जास्त आहे. त्याचवेळी १९८० नंतर विवाहदरात ऐतिहासिक घट झाली आहे. गेल्या ४४ वर्षांत सर्वात कमी लग्नं झाली. ‘सिंगल’ राहणं हा जणू काही नवा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. आर्थिक मंदी आणि कुटुंब रचनेत झालेल्या बदलांमुळे ही प्रवृत्ती आणखी वेगानं वाढते आहे.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, हा बदल चिनी समाजाला ‘पारंपरिक कुटुंब मॉडेल’च्या शेवटाकडे आणि ‘वैयक्तिक स्वातंत्र्या’कडे घेऊन जातो आहे. आता महिला स्वतःची वेगळी ओळख आणि आत्मसन्मान मिळविण्यासाठी घटस्फोटाकडे नव्या सामाजिक अधिकारासारखं पाहत आहेत. हा बदल समाजातील परिवर्तन आणि महिलांच्या वाढत्या अधिकारांचा संकेत आहे; पण यामुळे चीन सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे, हे निश्चित.