विशेष लेथ: बोस्टन मॅरेथॉनमधील हळवे क्षण, ज्यानं जग हेलावलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:15 IST2026-04-25T11:10:04+5:302026-04-25T11:15:02+5:30
बोस्टन मॅरेथॉन. जगातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध मॅरेथॉनपैकी एक. १८९७ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन केवळ उच्च दर्जाच्या खेळाडूंच्या कामगिरीसाठीच नव्हे, तर इतर अनेक गोष्टींसाठीही ओळखली जाते. दरवर्षी हजारो स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात आणि या शर्यतीत अनेकदा स्पर्धेच्या पलीकडचे, हेलावणारे क्षणही अनुभवायला मिळतात. यंदाही तसेच काही अनुभव आले.

विशेष लेथ: बोस्टन मॅरेथॉनमधील हळवे क्षण, ज्यानं जग हेलावलं!
बोस्टन मॅरेथॉन. जगातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध मॅरेथॉनपैकी एक. १८९७ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन केवळ उच्च दर्जाच्या खेळाडूंच्या कामगिरीसाठीच नव्हे, तर इतर अनेक गोष्टींसाठीही ओळखली जाते. दरवर्षी हजारो स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात आणि या शर्यतीत अनेकदा स्पर्धेच्या पलीकडचे, हेलावणारे क्षणही अनुभवायला मिळतात. यंदाही तसेच काही अनुभव आले. त्यातलाच एक आणि सध्या संपूर्ण जगात गाजत असलेला या शर्यतीतील हा क्षण... अंतिम रेषा समोर दिसत असताना अगदी काही मीटर अंतरावर एक धावपटू जमिनीवर कोसळला. त्याही स्थितीत तो पुन्हा उठला आणि त्यानं धावायचा प्रयत्न केला, पण पुन्हा पडला. तो पुन्हा उभा राहिला, पण पायांत पेटके आलेले असल्यानं पुन्हा खाली पडला.
तो इतका थकला होता की, त्याच्या अंगातलं आणि पायांतलं त्राणच गेलं होतं. त्याची जिद्द कायम होती, पण शरीरानं साथ सोडली होती. त्याचदरम्यान त्याच्यामागून एक स्पर्धक आला. त्यानं त्याला उभं राहायला मदत केली. त्यानंतर दुसराही स्पर्धक आला, त्यानंही त्याला मदत केली; पण त्याला स्वत:हून चालणं शक्य नव्हतं. तेव्हा या दोघांनी त्याला आपल्या खांद्यांचा आधार दिला आणि त्याला अंतिम रेषा पार करून दिली. या मॅरेथॉनपटूचं नाव अजय हरिदासे आणि इतर ज्या दोघा धावपटूंनी त्याला मदत केली यांची नावं रॉबसन ऑलिव्हेरा आणि ॲरॉन बेग्स. सगळे वेगवेगळ्या देशांचे. अगदी ऐन क्षणी थकव्यामुळे अजय आता कदाचित हार मानणार असं वाटल्यानं या दोघांनी त्याला मदत केली आणि त्याची अंतिम रेषा पार करून दिली.
या क्षणाचा व्हिडीओ जगभर वायुवेगानं व्हायरल होत आहे आणि सर्व जण त्यांचं मनापासून कौतुक करीत आहेत. या घटनेनं केवळ अजयचंच नाही, तर लक्षावधी चाहत्यांचं हृदय हेलावलं. खिलाडूवृत्ती काय असते, याचं उत्तम उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे. २१ वर्षीय अजय सांगतो, काहीही झालं तरी ही मॅरेथॉन पूर्ण करायचीच या जिद्दीनंच मी या शर्यतीत उतरलो होतो, पण अंतिम रेषेजवळ आल्यानंतर माझ्या पायांतली शक्ती गेली. पायांत पेटके आल्यानं चालणं तर सोडाच उभं राहाणंही मला अशक्य झालं. चौथ्यांदा खाली पडल्यानंतर रांगत शर्यत पूर्ण करायचा विचार मी करत होतो, मात्र तशी वेळ आली नाही. या दोघांनी मला मदत केली नसती तर पुढच्या शर्यतीसाठी पात्रतेची वेळ मला मिळवता आली नसती.
मॅरेथॉननंतर, अजयनं या दोघांची माहिती मिळवली आणि त्यांचे मनापासून आभार मानले, धन्यवाद दिले. अजयला मदत करण्यासाठी त्यांनीही स्वतःच्या वेळेचा त्याग केला होता. अजयला मदत केली नसती, तर ऑलिव्हेराची आतापर्यंतची ही सर्वांत वेगवान शर्यत ठरली असती. दोन्ही धावपटूंनी पुढच्या मॅरेथॉनसाठी पात्रतेचा निकष पूर्ण केला, याचा मात्र अजयला खूप आनंद झाला. याच मॅरेथॉनमधल्या दुसऱ्या अशाच एका घटनेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंतिम टप्प्यात पूर्णपणे थकून गेलेल्या एका महिलेला आता उभंही राहवत नाही. शर्यत सोडून देण्याऐवजी ती खाली बसते. आपले हात आणि शरीराचा वापर करून जमिनीवरून स्वतःला सरकवत सरकवत इंचाइंचानं अंतिम रेषेच्या जवळ जाऊ लागते. अंतिम रेषा ओलांडेपर्यंत, जवळ उभे असलेले लोकही तिला प्रोत्साहन देत असतात.. या अशा घटनांनी बोस्टन मॅरेथॉन अजरामर झाली आहे.