लेख: शहरांच्या भिंती अशा चित्र-विचित्र रंगतात, त्यामागच्या कहाण्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 09:17 IST2026-05-14T09:16:09+5:302026-05-14T09:17:44+5:30
अतृप्त भावना, स्वातंत्र्याची आस आणि उन्मादातला आनंद ग्राफिटीच्या मुळाशी असतो. भिंतींवर उमटणारी ग्राफिटी हा वर्तमानाचा आरसा आहे.

लेख: शहरांच्या भिंती अशा चित्र-विचित्र रंगतात, त्यामागच्या कहाण्या...
-हिमानी नीलेश (सिनिअर लायब्ररी ऑफिसर, ॲडलेड, ऑस्ट्रेलिया)
जोना इथे पडीक असायचा. ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड या आमच्या शहरात दुर्लक्षित झालेल्या जुन्या प्रॉपर्टीच्या मागे त्याला मोकळं रान मिळायचं. दोन वेळा तिथे ग्राफिटी केल्यानंतर शिक्षा म्हणून नगरपालिकेनं त्याला ती पुसायला लावली. जोनासारख्या भटक्या दिलखुलास तरुणासाठी अशा रितीनं पकडलं जाणं आणि आपली कारागिरी पुसली जाणं हे भलतंच नामुष्कीचं होतं.
अमेरिकेत १९६० मध्ये डॅरील मॅक रे उर्फ कॉर्नब्रेड या तरुणाने पहिल्यांदा मॉर्डन ग्राफिटी करायला सुरुवात केली. त्याला कॉर्नब्रेड हे नाव कसं पडलं याची अजून एक रोचक कहाणी आहे. हा डॅरील सुधारगृहात असताना त्याला त्याच्या आजीच्या हातच्या कॉर्नब्रेडची आठवण येई. तिथल्या स्वयंपाक्याकडे तो सतत कॉर्नब्रेडची मागणी करत असे. मग त्याने स्वत:चं ते टोपण नावच करून टाकलं. हे नाव तो ग्राफिटीमधल्या टॅगिंग प्रकारासाठी वापरत असे. थोडा वयात आल्यावर तो सिंथियाच्या प्रेमात पडला आणि कॉर्नब्रेड लव्हज सिंथिया असा मेसेज त्याच्या ग्राफिटीमधून सर्वत्र भिंतींवर गिरवू लागला.
अतृप्त भावना, स्वातंत्र्याची आस आणि उन्मादातला आनंद असं बहुदा ग्राफिटीच्या मुळाशी दिसून येतं असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. तर अशा ग्राफिटीवीरांना लगाम घालण्यासाठी खट्याळ मुलालाच वर्गप्रमुख केल्याप्रमाणे तेव्हाच्या महापौराने ग्राफिटीकडून म्युरल्सकडे अशा संघटनेचं अध्यक्षपदच कॉर्नब्रेडला दिलं. मग त्यानं ते काम हिरिरीने केलं. आज तो तरुणांचा दिशादर्शक आणि एक वक्ता म्हणून काम करतो.
या ग्राफिटीचे पडसाद जगभरात दिसतात. ऑस्ट्रेलियात स्प्रे पेंटिंगची बाटली घेऊन जिथे कोणी पोचू शकणार नाही अशा उंचीवर, अंधाऱ्या गल्लीत, जुन्या दुर्लक्षित जागांमध्ये असे उद्योग अनेक मंडळी करताना दिसतात. ज्या दुकानांमध्ये अशा बाटल्या विकल्या जातात त्यांना चक्क कुलूप घातलं जातं. त्यामुळे या बाटल्या पळवल्या जात नाहीत. तरीदेखील मेलबर्नच्या अगदी शहराच्या मधोमध असलेल्या काही गल्ल्या तर केवळ ग्राफिटीसाठीच प्रसिद्ध आहेत.
इथली एसीडीसी लेन ही इथल्या प्रसिद्ध रॉकबॅण्डच्या नावाने ओळखली जाते. कारण इथे बहुतांशी म्युझिक म्युरल्स केली जातात. होईजर लेनमध्ये राजकीय भाष्य करणारी ग्राफिटी दिसते. १९८०च्या सुमारास जेव्हा नुसती ग्राफिटी बंद होऊन त्यात कलात्मकता आली आणि ग्राफिटीचा बाज तसाच ठेवून म्युरल्स होऊ लागली तेव्हा तिथे प्रवाशांचा ओघ सुरू झाला. मग राजकारण्यांनीदेखील याचं महत्त्व ओळखलं.
मॉडर्न ग्राफिटी रंगीबेरंगी असते. त्यात थ्रो अप, थ्रीडी असे अनेक प्रकार असतात. काही ग्राफिटी आर्टिस्ट ग्राफिटीच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतात. पब्ज, व्यायामशाळा, मोठी पाण्याची टाकी अशा ठिकाणी तुम्हाला ग्राफिटी करून हवी असेल तर त्याचं रितसर कंत्राटपण घेतात. आपल्याकडे पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात गिरगोट्या असलेल्या कित्येक भिंतींचं रूपांतर उत्स्फूर्त स्वयंसेवकांनी वेधक चित्रांमध्ये केलेलं बघितल्यावर डोळे आणि मन दोन्ही निवतं. आज जोनाच्या ग्राफिटीची बातमी पुन्हा वाचली. त्याच्या घरची परिस्थिती सध्या ठीक नाहीये !
himaninilesh123@gmail.com