रवींद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार
कधी काळी डोंगरीत भाईगिरी करणारा सलीम डोला तुर्कीच्या इस्तंबुल शहरातील आलिशान फ्लॅटमध्ये पकडला गेला, तेव्हाच भारतातील ड्रग्ज तस्करीचे त्याचे अवाढव्य सिंडीकेट उघडकीस येण्याची आशा पल्लवित झाली होती. त्याला भारतात आणल्यानंतर त्याची ड्रग नेटवर्कच्या अलिबाबाची गुहा एनसीबीला सापडलीय आणि सध्या तरी केवळ १,७४५ कोटींच्या कोकेनचे घबाड हाती लागलेय. अजून किती हजार कोटींचे ड्रग्ज व्यवहार उघडकीस येतील, याचा अदमास यायचा आहे. त्याचा तपास पूर्ण होईल, तेव्हाच कदाचित त्याचे संपूर्ण ड्रग्ज एम्पायर उघडे पडेल.
परदेशात मुक्काम ठोकून भारतात ड्रग्ज तस्करीचे जाळे बसवणाऱ्या काही बड्या माशांना गेल्या वर्षभरात भारतात आणले गेले असले, तरी अशा बड्या माशांची काही कमी नसल्याने जगात कितीही उलथापालथ झाली, तरी ड्रग्जचा ओघ काही केल्या थांबत नाहीय. त्यात बॉम्बे टू गोवा टेरीटेरी म्हणजे ड्रग्जमाफियांसाठी हिरवेगार कुरणच. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेली मुंबई ही आर्थिक राजधानी आणि गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र, ही दोन्ही ठिकाणे केवळ त्यांच्या विकासासाठीच नव्हे, तर ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या विळख्यामुळेही चर्चेत आहेत.
देशात येणाऱ्या ड्रग्जचा एक मोठा वाटा मुंबई - गोव्यातून प्रवाहित होणाऱ्या तस्करीशी संबंधित आहे. ही समस्या केवळ कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींपुरती मर्यादित नाही. ती भौगोलिक स्थान, जागतिक गुन्हेगारी सिंडिकेट्सची बदलती रणनीती आणि तांत्रिक प्रगती अशा गुंतागुंतीने बनलेली आहे. मुंबईचे आंतरराष्ट्रीय जेएनपीटी बंदर आणि विमानतळ हे या तस्करीचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून वापरले जातात, तर गोव्याचा विशाल समुद्रकिनारा आणि पर्यटनासाठी असलेली मोकळी संस्कृती ही तस्करीसाठी सुपीक ठरत आहे.
मुंबई - गोव्यात ड्रग्जतस्करी रोखण्यात येणाऱ्या अपयशाचे मूळ तस्करांच्या बदलत्या कार्यपद्धतीत दडलेले आहे. पूर्वीची तस्करी ही प्रामुख्याने मानवी वाहकांद्वारे केली जात असे. आता ती अधिक तांत्रिक आणि कॉर्पोरेट स्वरूपाची झाली आहे. एखाद्या पिरॅमिडप्रमाणे काम करणारे ड्रग्ज तस्करीचे जाळे प्रामुख्याने तीन स्तरांवर विभागलेले दिसते. पहिल्या म्हणजेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेले मेक्सिकन कार्टेल्स किंवा नायजेरियन किंगपिन्स हे ड्रग्जचे उत्पादन, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक व्यवस्था सांभाळतात. दुसऱ्या स्तरावर प्रादेशिक किंवा आंतरराज्य वितरक आणि स्थानिक एजंट आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या मोठ्या साठ्यांचे लहान लहान पार्सल तयार करतात आणि हवाला - डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार हाताळतात. तिसऱ्या आणि सर्वात खालच्या स्तरावर स्थानिक पेडलर्स, टॅक्सी चालक आणि समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्समध्ये काम करणारे कर्मचारी थेट पर्यटक व स्थानिक तरुणांपर्यंत हे ड्रग्ज पोहोचविण्याचे काम करतात. आता तर मेक्सिकोच्या ‘जालिस्को न्युएवा जनरेशन कार्टेल’ आणि ‘सिनालोआ कार्टेल’ यांसारख्या शक्तिशाली संघटनाही भारताकडे वळल्या आहेत.
तस्करांनी आता पारंपरिक संपर्क पद्धती सोडून ‘डार्क वेब’चा आधार घेतला आहे. डार्क वेबवर एलएसडी, एमडी आणि इतर सिंथेटिक ड्रग्जची विक्री ई-कॉमर्स साइट्सप्रमाणे केली जाते. या व्यवहारांचे पैसे देण्यासाठी ‘बिटकॉइन’ किंवा ‘मोनेरो’सारख्या क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात असल्याने तपास यंत्रणांना पैशांचा मागोवा घेणे कठीण होते. मुंबई आणि गोव्याचा समुद्रकिनारा तस्करीसाठी सर्वात सुरक्षित मानला जातो. मोठ्या जहाजांव्यतिरिक्त, छोट्या मासेमारी नौकांचा वापर करून समुद्रात ड्रग्जची देवाणघेवाण होते.
तस्करी पूर्णपणे न रोखता येण्यामागे कायदेशीर आणि तांत्रिक अडथळेही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. एनडीपीएस ॲक्ट, १९८५ हा अत्यंत कडक कायदा असला, तरी त्याच्या अंमलबजावणीत अनेक पळवाटा शोधल्या जातात. मुंबई आणि गोव्यातील ही समस्या सोडविण्यासाठी एक बहुआयामी धोरण राबवणे आवश्यक आहे. ‘नॅशनल मेरिटाइम डोमेन अवेअरनेस’अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि इस्रोच्या उपग्रहांच्या मदतीने ‘डार्क शिप्स’वर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ‘नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या माध्यमातून सर्व राज्यांच्या पोलिसांनी माहितीची देवाण-घेवाण करणे आवश्यक आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत शाळा, कॉलेजांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यावर भर दिला पाहिजे. एनडीपीएस खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयांची संख्या वाढवून हे खटले वेगाने निकाली काढले पाहिजेत.
मुंबई आणि गोवा ही भारताची भूषणे असली, तरी ड्रग्जचा विळखा त्यांना सामाजिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. तस्करांचे जागतिक नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे आव्हान अधिक कठीण झाले आहे. तस्करी रोखण्यासाठी केवळ धाडी टाकून उपयोग नाही, तर कडक सागरी सुरक्षा, तस्करांची आर्थिक नाकेबंदी आणि तरुणांना या विळख्यातून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. समाज आणि सरकार एकत्रितपणे काम करतील, तेव्हाच मुंबई आणि गोवा टापू खऱ्या अर्थाने ड्रग्जमुक्त होऊ शकेल, अन्यथा एक सलीम डोला पकडला गेला, तरी त्याची जागा घेण्यासाठी हजारो सलीम डोला दबा धरून बसलेले आहेतच.
Web Summary : Mumbai and Goa's drug problem stems from international cartels using advanced technology. Stricter maritime security, financial crackdown, and youth rehabilitation are crucial to dismantle networks.
Web Summary : मुंबई और गोवा में ड्रग्स की समस्या अंतरराष्ट्रीय गिरोहों द्वारा उन्नत तकनीक के उपयोग से उत्पन्न होती है। सख्त समुद्री सुरक्षा, वित्तीय कार्रवाई और युवा पुनर्वास नेटवर्क को नष्ट करने के लिए महत्वपूर्ण हैं।